देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या दिवाळी किंवा दीपावली या सणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. देशातील प्रत्येक घर, गल्लीबोळ दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेलं असतं. अशी ही दिवाळी प्रत्येक शहरात, राज्यात अगदी दिमाखात आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. चला तर मग, देशातील विविध राज्यांमधून आणि वेगवेगळ्या शहरांमधून दिवाळी कशी साजरी केली जाते ते पाहू.
१. अयोध्या
ज्या ठिकाणी प्रभू श्री रामाचा जन्म झाला, अशा या अयोध्यामध्ये दिवाळी अगदी दिमाखात साजरी होते. आजवर आपण ऐकत आलेल्या माहितीनुसार आणि पुस्तकांनुसार जेव्हा प्रभू श्री राम आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासोबत १४ वर्षांचा वनवास संपवून परतले, तेव्हा सर्वात पहिल्यांदा दिवाळी हा सण साजरा केला गेला. शरयू नदीकाठी सर्व जण पणत्या, दिवे लावण्यासाठी एकत्र येतात. अशी दिवाळी अयोध्येमध्ये चार दिवस साजरी केली जाते.
२. अमृतसर
अमृतसर येथे भव्यदिव्य प्रकारे दिवाळी साजरी होते. अमृतसरमध्ये शीख धर्माचे सहावे गुरु, गुरु हरगोविंद [हरगोबिंद] हे जेव्हा १६१९ साली त्यांचा कारावास संपवून परतले तेव्हा तिथे सर्वात पहिली दिवाळी साजरी केली गेली.
३. वाराणसी
भारतातील प्राचीन हिंदू शहरांपैकी एक असलेल्या वाराणसी शहरामध्ये अत्यंत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी होते. संपूर्ण गंगा नदीच्या घाटावर पणत्यांची आरास केली जाते. पणत्यांच्या प्रकाशामध्ये उजळून निघालेला गंगेच्या घाटाचं आणि गंगा नदीचं हे दृश्य अत्यंत विलोभनीय असे असते. दिवाळीदरम्यान किंवा खास दिवाळीसाठी तुम्ही वाराणसीमध्ये असाल तर तुम्हाला प्रचंड अध्यात्मिक वातावरण अनुभवता येईल. दिवाळी झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर पौर्णिमेला येणारी देवदिवाळी वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
हेही वाचा : थंडीमध्ये कशी घ्याल आपल्या नाजूक ओठांची काळजी? पाहा, या घरगुती ट्रिक्स पडतील उपयोगी….
४. उदयपूर
उदयपूरमध्ये साजरी होणारी दिवाळीदेखील अनुभवण्यासारखी असते. उदयपूरमध्ये असलेल्या आणि धनाची देवता असणाऱ्या, महालक्ष्मीच्या मंदिरात सर्व भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात. २०१२ साली राजस्थान सरकारने विविध प्रकारचे कार्यक्रम ठेऊन, थाटामाटात दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली.
५. गोवा
गोव्यामध्ये अगदी वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी होत असते. दिवाळीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाने, नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. दरवर्षी दिवाळीत गोव्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचसोबत दिवाळीआधी येणाऱ्या नरकचतुर्दशीच्या दिवशी, नरकासुर राक्षसाचे पुतळे जाळून दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे.
६. कोलकाता
देशभरात दिवाळीमध्ये लक्ष्मी देवीची पूजा केली जाते, पण कोलकात्यामध्ये मात्र दिवाळीत काली मातेची पूजा केली जाते. त्यामुळे दिवाळीत कोलकातामधील काली मातेच्या मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. दिवाळीत कोलकात्यामधील काली घाट, बेलूर मठ आणि दक्षिणेश्वर या जागा भेट देण्यासारख्या आहेत.
७. अहमदाबाद
गुजरातमध्ये धनत्रयोदशीपासून पुढे पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजे सोनं खरेदी करण्याचा दिवस. त्यानंतर येते नरकचतुर्दशी; जेव्हा भगवान श्री कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला. त्यानंतर येते दिवाळी, बलिप्रतिपदा आणि शेवटचा दिवस म्हणजे विक्रम संवत्सर.
अशा विविध पद्धतींनी भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.