सर्व जण उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात; आणि याचे मुख्य कारण म्हणजे आंबा. आंबा न आवडणारी व्यक्ती अगदी दुर्मीळ असेल. मार्च महिना आला की, आंब्याची चाहूल लागायला सुरुवात होते. विविध प्रकारचे आंबे बाजारात यायला सुरुवात होते. प्रत्येक जण आंबे कुठे चांगले मिळतात, त्यांचे दर काय याची माहिती मिळवायला सुरुवात करतो. कारण आंबा हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यातून जर तो हापूस असेल तर बातच न्यारी! पण अस्सल हापूस कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणातला हापूस आंबा अत्यंत प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने देवगड, रत्नागिरी या ठिकाणांहून तो विविध शहरांमध्ये विक्रीसाठी आणला जातो. इतकेच काय, तर परदेशातही याची निर्यात केली जाते. पण अनेकदा पहिला आंबा खाण्याच्या नादात लोक तो कसा पिकवला आहे किंवा तो अस्सल हापूस आहे की नाही हे पारखण्यास कमी पडतात. याचबरोबर हापूससारखेच दिसणारे दुसऱ्या जातीचे आंबेही बाजारात येतात. त्यामुळेही अनेकदा गोंधळ होऊ शकतो. पण अस्सल आणि कोणतेही रसायन न वापरता पिकवलेला हापूस ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत.

आणखी वाचा : ‘या’ जातीच्या बटाट्यांना मिळतो चक्क सोन्याचा दर, किंमत ऐकून व्हाल थक्क

१. सुवास –
हापूस आंब्याचा वास ही आंबा ओळखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हापूस आंब्याचा वास हा पटकन लक्षात येण्यासारखा असतो. याचबरोबर आंबे पिकताना त्याचा सुवास आजूबाजूला दरवळतो. रसायने वापरून पिकवलेल्या आंब्याला कसल्याही प्रकारचा वास येत नाही.

२. आकार –
हापूस आंबा हातात घेतल्यावर तो आतून भरलेला आणि आकाराने काही अंशी गोल दिसतो. याचा अर्थ इतर आंब्यांप्रमाणे त्याची खालची बाजू निमुळती नसते. तर त्याच्या देठाकडील भाग हा काहीसा मऊ असतो.

३. रंग –
हापूस आंबा हा पूर्णपणे पिवळा कधीही नसतो. नैसर्गिकरीत्या पिकवलेला हापूस हा आधी हिरवा, मग पिवळा आणि नंतर काहीसा लालसर होतो. जर संपूर्ण आंब्याला एकच रंग असेल तर तो रसायने वापरून पिकवलेला असल्याची शक्यता अधिक असते.

४. साल –
हापूस आंब्याची साल इतर आंब्यांच्या मानाने पातळ असते. तर याचबरोबर त्याचा स्पर्श अत्यंत मऊ असतो. रसायने वापरून पिकवलेला आंबा हाताला थोडा कडक आणि खरखरीत लागतो.

हेही वाचा : Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते का? काय सांगतात तज्ज्ञ, वाचा

५. चव –
हापूस आंब्याची चव ही कमी तंतुमय आणि खास असते. आंब्याची फोड खाल्ल्यानंतर त्याची चव आपल्या जिभेवर बराच काळ राहते.

आंबा खरेदी करताना जर तुम्ही या पाच गोष्टींकडे नीट लक्ष दिले, तर हापूस आंब्याच्या नावाखाली कोणीही तुमची फसवणूक करू शकणार नाही.