गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोदी सरकारने तीन कृषी कायद्यांची घोषणा केली. पण त्यानंतर मात्र गोंधळ निर्माण झाला. हजारो, लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करण्यासाठी जमा झाले. साधारण वर्षभर हे आंदोलन सुरू होतं. त्यानंतर आता आज हे तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या या कायद्यांविषयी.
कोणते आहेत हे कायदे?
पहिला कायदा- शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
प्रमुख तरतुदी-
- कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री
- कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे
- मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे
- इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे
- शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
दुसरा कायदा – शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020
प्रमुख तरतुदी-
- हा कायदा कंत्राटी शेतीबद्दल बोलतो. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.
- आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल.
- 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल.
- बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहील.
- मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात.
- शेती क्षेत्राचं उदारीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे असंही म्हटलं जातंय.
तिसरा कायदा – अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020
प्रमुख तरतुदी –
- Essential Commodities (Amendment) Bill म्हणजे अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक हा तिसरा आहे, ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय.
- डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. अपवाद:-युद्धसदृश असामान्य परिस्थिती.
- निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल.
- किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा.
हेही वाचा – कृषी कायदे मागे घेताना काय म्हणाले पंतप्रधान मोदी? जाणून घ्या सविस्तर…
काय आक्षेप आहेत या कायद्यांबद्दल?
पहिला कायदा- शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
- APMC बाहेर विक्री झाल्यास ‘बाजार शुल्क’ न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल.
- बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडते यांचं काय होणार?
- किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल.
- e-NAM सारख्या ई-ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवर अवलंबून असतात. बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालतील?
दुसरा कायदा – शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020
- कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का?
- अनेक लहान-लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का?
तिसरा कायदा – अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020
- मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील.
- शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती.
- कांदा निर्यातबंदी सारख्या निर्णयांमुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबद्दल साशंकता.