करोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढल्याने जगाची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. हा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांबाबत सतर्क झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. ओमिक्रॉनबद्दल सर्वांच्याच मनात शंका-कुशंका आहेत.
या विषाणूची लक्षणं काय?
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संस्थान (एनआयसीडी) ने दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी वेगळी लक्षणं दिसून येत नाहीत. डेल्टाप्रमाणेच ओमिक्रॉननं बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये कोणतीही विशेष लक्षणं आढळली नाहीत.
लक्षणं सौम्य, मात्र तरुणांना धोका अधिक
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी पडल्याची भावना येणे अशी लक्षणं दिसू शकतात. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.
कशी केली जाते चाचणी?
ओमिक्रॉनच्या चाचणीबद्दल सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की, सध्या SARS-CoV-2ची PCR चाचणी केली जात आहे. नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत इतर अनेक देशही सतर्क झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी चाचणी करणं बंधनकारक असणार आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. जगभरातील सर्वच देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकी देशांतून विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.