Government loans schemes for women entrepreneurs : देशात सध्या महिला उद्योजकांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना देखील जाहीर केल्या आहेत. महिला उद्योजकांना कर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी देखील विविध योजना अस्तित्वात आहेत, याच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकतो. अशा काही योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

अन्नपूर्णा योजना

अन्नपूर्णा योजना ही फूड आणि केटरिंग संबंधीत व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेमध्ये महिला ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज ३६ हप्त्यांमध्ये परत करता येते आणि त्यासाठी तारण आणि हमीदाराची मान्यता लागते. मालमत्तेच्या स्वरुपातील तारण या योजनेत स्वीकारले जाते.

मुद्रा कर्ज योजना

मुद्रा कर्ज योजना ही सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे. या अंतर्गत उद्योगांसाठी कर्ज पुरवले जाते. मुद्रा कर्ज योजने अंतर्गत सरकार १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. कर्ज घेतलेल्या रकमेसाठी तारण किंवा सेक्युरिटी आवश्यक नसते आणि हे कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता तुलनेने सोपी आहे.

स्टँड अप इंडिया योजना

अर्थ मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेमध्ये अनुसूचित जाती व जमाती, तसेच महिला उद्योजकांना नवीन उपक्रम सुरू करण्याकरिता १० लाख रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अनुसूचित जाती व जमातींतील व्यावसायिक व महिला व्यावसायिकांना व्यावसायिकतेस प्रोत्साहन देणे आहे.

या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक बँकेच्या शाखेत किमान एका महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उद्योजकाला ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारण्यासाठी १० लाख रुपये ते १ कोटी रुपये कर्ज देईल. वैयक्तिक नसलेल्या प्रकल्पामध्ये किमान ५१ टक्के हिस्सा महिला, अनुसूचित जाती किंवा जमातीमधील उद्योजकाकडे असावा अशी अट आहे.

स्त्री शक्ती योजना

स्त्री शक्ती योजना ही महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २००० मध्ये सुरू केलेली ही योजना महिला उद्योजकांना २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर ०.०५ टक्क्यांची सूट देते.

सेंट कल्याणी योजना

सेंट कल्याणी योजना ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पाठिंब्याने स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत चालवली जाते. या योजनेचा उद्देश भारतातील महिला उद्योजकांना पाठिंबा आणि मदत देणे हा आहे.

उद्योगिनी योजना

उद्योगिनी योजना ही भारत सरकारने सुरू केलेली योजना असून याअंतर्गत देशातील महिलांच्या उद्योजकतेला आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेअंतर्गत सरकार महिला उद्योजकांना इतर कर्ज देणाऱ्या बँकांच्या तुलनेत कमी व्याजदराने कर्ज देते. ज्यामध्ये सरकारकडून ४०,००० रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला उद्योजकांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देते .