sneakers and walking shoes : शूज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. स्पोर्ट शूज पासून ते प्रोफेशनल शूज असे अनेक प्रकार तुम्हीही वापरले असतील. आजकाल बाजारात हजारो प्रकारचे वेगवेगळ्या स्टाईलचे शूज उपलब्ध आहेत. सध्या स्नीकर्स वापरणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की चालताना किंवा धावण्यासाठी वापरले जाणारे शूज आणि स्नीकर्स हे वेगवेगळे असतात. पण या दोन्हींमध्ये नेमका काय फरक असतो?
धावण्याचे शूज आणि स्नीकर्स या दोन्हीचा वापर खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. कॉम्फोर्ज फूटवेअरच्या संस्थापक परवीन जग्गा यांनी चालण्याचे शूज आणि स्निकर यांच्यातील नेमका फरक सांगितला आहे. जग्गा यांच्या मते चालण्याचे शूज आणि स्नीकर यांचा उद्देश, त्यांचे सोल स्ट्रक्चर, वजन आणि त्यांचा टिकाऊपणा यामध्ये खूप फरक असतो.
चालण्याचे शूज हे टाचेपासून पंजापर्यंत दीर्घकाळ आणि वारंवार होणारी हलचाल लक्षात घेऊन बनवले असतात, तर स्नीकर्सचे वेगवेगळे प्रकार पडतात, यामध्ये त्याचा टिकाऊपणा यापेक्षा त्याच्या डिझाईनमधील वैविध्यावर भर देण्यात आलेला असतो.
चालण्याच्या शूजमध्ये पुढचा तळव्याचा भाग हा लवचिक असतो. तसेच त्याच्या सोलला एक वक्राकार देखील असतो, जेणेकरून पायाच्या तळव्याला त्यामुळे आधार मिळू शकेल आणि चालताना किंवा धावताना यामुळे पायाला बसणारे धक्के हे शोषले जातील. तर दुसरीकडे स्नीकर्स हे एक लाईफस्टाईल प्रॉडक्ट आहे. स्नीकर्समध्ये सोल ही सपाट असते आणि यामध्ये पायांना पुरेसा सपोर्ट किंवा कुशनिंग मिळेलच असे नाही.
वॉकिंग शूज हे वजनाला हलके आणि अधिक टिकाऊ असतात. तर स्नीकर्स तुम्ही दररोजच्या वापरासाठी किंवा धावण्यासाठी वापरू शकत नाहीत, ते इतका ताण सहन करू शकणार नाहीत.
बऱ्याचदा वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळे शूज वापरले जातात, त्यामुळे शूज कशासाठी वापरले जाणार आहेत याच्यावरून त्यांची निवड केली जाते.