Qr Code Aadhar Card And Pan Card : अनेक लहान- मोठ्या दुकानांपासून ते सरकारी कार्यालयांमध्ये एक गोष्ट कॉमन झाली आहे ती म्हणजे क्यूआर कोड. क्यूआर कोड स्कॅन करताच एक सेकंदात आपण दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करु शकतो. याशिवाय क्यूआर कोडच्या मदतीने अनेक गोष्टींची माहिती घेता येते. पण तुम्ही पाहिलं असेल आता पॅनकार्ड आणि आधारकार्डावरही क्यूआर कोड असतो. जो सर्व डॉक्यूमेंट्सवर वेगळा असतो. पण पॅनकार्ड आणि आधार कार्डवर छापलेल्या क्यूआर कोडमध्ये काय विशेष असते आणि तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती कळते, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? अनेकांचे उत्तर नाही असेच असेल. त्यामुळे आज आपण पॅन कार्ड आणि आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून कोणती माहिती मिळते जाणून घेऊ…
पॅन कार्डवरील क्यूआर कोडमध्ये कोणती माहिती असते?
तुमच्या आर्थिक व्यवहारासंबंधीत सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणून पॅनकार्ड ओळखले जाते. या पॅनकार्डवर एक क्यूआर कोड छापलेला असतो. जेव्हा तुम्ही पॅन कार्डचा क्यूआर कोड स्कॅन करता तेव्हा तुम्हाला पॅन कार्ड धारकाबद्दल अनेक तपशीलवार माहिती दिसते. या माहितीमध्ये पॅनकार्डधारकाचा फोटो आणि सही महत्त्वाची आहे. यासोबतच स्कॅनिंग करताना पॅन, नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती मिळते. जर पॅनकार्ड एखाद्या कंपनीच्या नावावर असेल तर या क्यूआर कोडद्वारे कंपनीबद्दल काही माहिती मिळू शकते.
आधार कार्डवरील क्यूआर कोडमधून कोणती माहिती मिळते?
आधार कार्डवरील क्यूआर कोडमध्ये नेमकी कोणती माहिती असते असा प्रश्न अनेकांना पडतो. तर या क्यूआर कोडमध्ये आधार क्रमांक, नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, आधार कार्डधारकाचा फोटो इत्यादी असते. जी तुम्हाला क्यूड स्कॅन करून मिळवता येते. याद्वारे ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाची माहितीही समोर येऊ शकते.
हे क्यूआर कोड आपण स्कॅन करू शकतो का?
क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी अनेक प्रकारचे मोबाइल अॅप्लिकेशन्स आहेत आणि त्याशिवाय तुम्ही ते तुमच्या फोनच्या क्यूआर कोड स्कॅनरद्वारे देखील ते स्कॅन करू शकता. ते स्कॅन केल्यानंतर कार्डधारकाची माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.