Mumbai railway name history : मुंबईकर आणि मुंबईची ‘लाईफलाईन’ मुंबई रेल्वे यांचे एक अतूट नाते आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई रेल्वेमधून प्रवास करत असतात. सुरुवातीला ‘आग ओकणारा राक्षस’ म्हणून घाबरणारे नागरिक, आता या सार्वजनिक वाहतुकीशिवाय मुंबईचा विचारदेखील करू शकणार नाहीत. जसजशी मुंबई शहराची प्रगती होत गेली, तसतसे रेल्वेचे हे जाळे पसरत गेले. नवनवीन स्थानकांची निर्मिती झाली. मात्र, रेल्वेच्या स्थानकांना दिलेली नावे ही तशीच का दिली गेली हे आज आपण जाणून घेणार आहोत. मुंबईच्या मध्य रेल्वेस्थानकांपैकी कुर्ला, विद्याविहार आणि घाटकोपर या स्थानकांना दिलेल्या नावामागे नेमके कारण काय हे पाहू.
दक्षिण मुंबईमधील बहुतांश रेल्वेस्थानकांना इंग्रजी नावे किंवा इंग्रजांच्या नावांवरून नावे ठेवण्यात आलेली आहेत. परंतु, मुंबई उपनगरांमधील रेल्वेस्थानकांना १०० टक्के भारतीय नावे देण्यात आलेली आहेत. मात्र, असे का? याचे कारण खरंतर खूपच साधे आणि सोपे आहे. तर त्या काळच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी जिथे स्थानकं होती, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्वात जवळचे जे गाव असेल त्यावरून या रेल्वेस्थानकांना नाव देण्याचे ठरवले. इतकेच नाही तर त्या गावांची नावे ही ६०० ते ७०० वर्ष जुन्या महिकावतीच्या बखरीतदेखील आढळून येतात. चला तर मग, मुंबई उपनगरातील तीन रेल्वेस्थानकांच्या नावांमागील गोष्ट जाणून घेऊ.
कुर्ला रेल्वेस्थानक [Kurla station]
कुर्ला या रेल्वेस्थानकाची स्थापना १८५६ साली करण्यात आली होती. सुरुवातीला या स्थानकामधील एक फलाट हा आजूबाजूला असणाऱ्या मिठागरांमधील मीठ वाहून नेण्यासाठी बांधण्यात आला होता. या रेल्वेस्थानकाजवळ काही टेकड्यादेखील त्या काळात होत्या. परंतु, त्या टेकड्यांवर मिळणारा दगड हा अतिशय उच्च प्रतीचा असल्याने, दक्षिण मुंबईतील अनेक टोलेजंग इमारतींच्या बांधकामासाठी त्यांचा वापर करण्यात आला. परिणामी, कुर्ला रेल्वेस्थानकाजवळील टेकड्यांना जमीनदोस्त करण्यात आले. परंतु, कुर्ला स्थानकाला ‘कुर्ला’ हे नाव कसे पडले?
तर असे म्हटले जाते की, कुर्ला गावठाण परिसराच्या आजूबाजूला खाडी होत्या आणि त्या खाडीमध्ये भरपूर प्रमाणात ‘कुर्ल्या’ म्हणजेच खेकडे मिळायचे. याच खेकड्यांच्या नावांवरून तेथील गावाला ‘कुर्ला’ हे नाव पडले आणि त्या काळातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्थानकाजवळील गावाच्या नावावरून आपल्या ‘कुर्ला’ रेल्वेस्थानकाला त्याचे नाव प्राप्त झाले.
विद्याविहार रेल्वेस्थानक [Vidyavihar station]
कुर्ला आणि घाटकोपरदरम्यान असणाऱ्या विद्याविहार स्थानकाची निर्मिती ही खरंतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली होती. म्हणूनच या स्थानकाला जवळच्या गावाचे नाव न देता, ‘विद्याविहार’ असे नाव देण्यात आले होते. परंतु, यामागची नेमकी गोष्ट काय? तर, कुर्ल्याच्या उत्तरेकडील भागात १९५९ साली साखरसम्राट करमसीभाई सोमय्या यांनी एक विद्यासंकुल बनवण्याचा निर्णय घेतला होता. याच विद्यासंकुलाचे नाव त्यांनी ‘विद्याविहार’ असे दिले. साधारण दोन वर्षांनंतर त्यांना असे लक्षात आले की, या विद्याविहारमध्ये शिकण्यासाठी येणारे जे विद्यार्थी आहेत ते कुर्ला किंवा घाटकोपर स्थानकावरून यायचे. जर या दोन स्थानकांदरम्यान एखादे स्थानक बांधले गेले तर ते विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरेल.
जर रेल्वे अधिकाऱ्यांच्या विचारांनुसार या स्थानकाला जवळच्या गावाचे नाव दिले गेले असते तर विद्याविहारचे ‘किरोळ’स्थानक असे नामकरण झाले असते. परंतु, शेवटी विद्या श्रेष्ठ म्हणून कुर्ला आणि घाटकोपरदरम्यान विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या या स्थानकाला ‘विद्याविहार’ हे नाव दिले गेले.
घाटकोपर रेल्वेस्थानक [Ghatkopar Station] :
सध्याचे घाटकोपर स्थानक हे आता केवळ रेल्वे लाईनसाठी नव्हे, तर आधुनिक काळातील मेट्रो मार्गासाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण मुंबईतील पहिली मेट्रो ही घाटकोपरवरूनच सुरू झाली होती. घाटकोपरवरून पवईचे डोंगर स्पष्ट दिसतात, त्यामुळे या डोंगरांच्या कोपऱ्यावर असल्याने या ठिकाणाला घाटकोपर म्हणतात, असे सांगितले जाते. परंतु, जर या स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरातील गावं पहिली, तर ‘घाटे’ आणि ‘कोपर’ अशा नावांची दोन गावं असल्याचे समजते. याच दोन शब्दांना जोडून, एकत्र करून ‘घाटकोपर’ असे नाव तयार झाले.
त्या काळात घाटकोपर या भागात ‘भाटिया’ समाजाच्या अनेकांनी आपले बंगले बांधले होते. तसेच दक्षिण मुंबईत जो कापड बाजार होता त्या बाजारावर भाटिया समाजाचे वर्चस्व होते, त्यामुळे घाटकोपरवरून भाटिया समाजाच्या लोकांसाठी खास लोकल निघायची, ज्याला लोक ‘भाटिया लोकल’ असे म्हणायचे.
व्हिडीओ पाहा :
अशा मुंबईतील, उपनगरांमधील कुर्ला, विद्याविहार आणि घाटकोपर या रेल्वेस्थानकांच्या नावांची रंजक माहिती ही लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून समजते.