How to apply for Ladki Bahin Yojana 2024 : स्त्री पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपक्रमांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध धोरणे, कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत. राज्य शासनाने ७ मार्च रोजी राज्याचे चौथे महिला धोरणही जाहीर केले आहे. याचबरोबर नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रीत काही योजना जाहीर केल्या. त्यानुसार, त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही जाहीर केली.
राज्यातील महिलांना प्राधान्य देत नव्या जुन्या योजनांचा मेळ घातला आहे. राज्यातील महिला आणि मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यासाठी पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्याोजकता, तसेच कौशल्य विकास आणि रोजगारासाठी विविध योजनांची घोषणा करीत त्या प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. महिलांसाठी विविध योजना सध्या लागू आहेत. त्यात आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची भर पडली आहे.
काय आहे लाडकी बहीण योजना? (What is Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. त्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये काय? (Features of Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
- ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी असेल.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ
- या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेला पात्र कोण असणार? (Who is Eligible Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
- सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे.
- २१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी.
- इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
- सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.
‘या’ कुटुंबातील महिलांना मिळणार नाही लाभ
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल,
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल
- सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत
- बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल,
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे १५०० रुपया पेक्षा जास्त लाभ घेतला असेल,
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असेल,
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य असेल,
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती (Documents for Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
- आधार कार्ड,
- मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- पिवळे किंवा केशरी कार्ड,
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका
- बँकेचे पासबूक,
- मोबाईल क्रमांक,
- पासपोर्ट साईज फोटो,
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? (How to Apply for Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
- ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी
- शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.
- नारी शक्ती या अॅपमधूनही तुम्ही अर्ज करू शकता
- https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवरून तुम्ही सहजरित्या अर्ज करू शकता.
१ जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या व ६५ वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत.
दरमहा १५०० रुपये
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.
या योजेनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी (बीपीएल) उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही.
हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
मोबाईलवरून कसा कराल अर्ज?
१) सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ हे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा.
२) ‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा.
३) ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘व्हेरिफाय ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा.
४) त्यानंतर ‘तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा’ असा संदेश येईल. तिथे ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’, या पर्यायावर क्लिक करा.
५) प्रोफाईल अपडेट करताना, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.
६) प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली ‘नारीशक्ती दूत’ या पर्यायावर क्लिक करा..
७) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा.
८) महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पीन कोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का?, वैवाहिक स्थिती आणि बॅंक खात्याच तपशील भरा.
९) संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखल/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि बॅंकेच्या पासबूकच्या फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा, आणि खाली ‘जतन करा’. या पर्यायावर क्लिक करा.
१०) तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि ‘अर्ज दाखल करा’, यापर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा.
१२) केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.
वेबसाईटद्वारे लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा? (How To Apply Online for Ladki Bahin Yojana)
https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
उजव्या बाजूला असलेल्या अर्जदार लॉगिनवर क्लिक करा.
खाली असलेल्या Creat Account वर क्लिक करा.
तुमच्या समोर आता साईनअपसाठी पेज ओपन झालेलं असेल.
तिथे असलेली माहिती भरा, कॅप्चा द्या आणि साईनअपवर क्लिक करा.
आता तुमचं अकाऊंट ओपन झालं.
आता होमपेजवर येऊन अर्जदार लॉगइनवर पुन्हा क्लिक करा आणि तिथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड भरा.
मेन्यूच्या बाजूला तीन पांढऱ्या रेषा असलेल्या सब मेन्यूबारवर क्लिक करा.
तिथे तुम्हाला Application For Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana वर क्लिक करायचं आहे.
तुमच्या समोर आता आधार कार्ड आणि कॅप्चा असलेलं पेज ओपन झालं असेल. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून वेरिफाय आधार करायचं आहे.
वेरिफाय आधार केल्यानंतर तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आला असेल. त्या फॉर्ममधील माहिती भरा.
माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली कागदपत्रांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
फोटो अपलोड करताना ५ एमबीच्या वर अपलोड करू नका. अन्यथा ते अपलोड होणार नाहीत.
संपूर्ण माहिती आणि कागदपत्र भरल्यानंतर सबमिट फॉर्मवर क्लिक करा. तुमच्यासमोर तुम्ही भरलेली माहिती आली असेल.
ही माहिती पुन्हा एकदा वाचा. या माहितीत काही बदल करायचे असतील तर काही असलेल्या ए़़डीटवर क्लिक करा. तिथे माहिती भरून पुन्हा सेव्ह करा.
आता तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी सज्ज आहे. खाली असलेल्या सबमिटवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Application Submitted Successfully असा पॉप अप मेसेज येईल. तिथंच तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि तुमचं नाव असेल.
हा फॉर्म आता प्रशासनाकडून तपासला जाईल. तुम्ही भरलेली माहिती योग्य असेल तर काही दिवसांनी तुम्हाला तुमचा अर्ज स्वीकारला असल्याचा मेसेज येईल.