All Thing About Vanuatu: इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात अर्ज केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी याला दुजोरा दिला आहे. आता ललित मोदी यांनी दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्र वानुआतूचे नागरिकत्व घेतले आहे. ललित मोदींनी भारतीय पासपोर्ट परत करत असल्याची आणि त्यांनी वानुआतूचे नागरिकत्व घेतल्याची बातमी समोर आल्यापासून देशभरात वानुआतू या देशाबद्दल चर्चा सुरू असून ज्याची लोकसंख्या मुंबई आणि पुण्यापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे.
कुठे आहे वानुआतू देश?
वानुआतू हा, नैऋत्य पॅसिफिक महासागरातील एक देश असून, तो १३ प्रमुख आणि अनेक लहान बेटांची साखळी आहे. हा देश ऑस्ट्रेलियापासून १,७७० किमी अंतरावर आहे. नैसर्गिक आपत्तींचा विचार करता वानुआतू जगातील सर्वात धोकादायक देश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि मानवी सुरक्षा विद्यापीठाच्या २०१५ च्या अहवालात, भूकंप, वादळ, पूर, दुष्काळ आणि समुद्र पातळी वाढण्याच्या शक्यतांवर आधारित एकूण १७३ देशांना असलेल्या धोक्यांची टक्केवारी दिली आहे. यामध्ये ३६.४३ टक्क्यांसह, वानुआतू पहिल्या क्रमांकावर होता.
मुंबई-पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या
ललित मोदींमुळे चर्चेत आलेल्या वानुआतूची लोकसंख्या मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत कितीतरी पटींनी कमी आहे. वर्ल्डोमीटरच्या ७ मार्च २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, वानुआतूची लोकसंख्या ३३२,७८४ इतकी आहे. वानुआतूची सुमारे ८० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. याचबरोबर या देशाची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ० टक्के इतकी आहे. लोकसंख्येनुसार वानुआतू जगात १८२ व्या क्रमांकावर आहे. त्यांचा एकूण भूभाग १२,१९० किमी (४,७०७ चौ. मैल) आहे.
जीडीपीमध्ये पर्यटनाचा सर्वाधिक वाटा
दरवर्षी सुमारे ९५,००० लोक वानुआतूला पर्यटानासाठी जातात. दरवर्षी वानुआतूला भेट देणारे ९५,००० पर्यटक खूप महत्वाचे आहेत. कारण, वानुआतूच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा जवळजवळ २० टक्के इतका आहे. पर्यटनासह शेती, पशुधन आणि ऑफशोअर वित्तीय सेवा हे अर्थव्यवस्थेचे इतर मुख्य घटक आहेत.
थेट विमानसेवा आणि व्हिसा मिळण्याच्या कठीण प्रक्रियेमुळे कदाचित वानुआतू हे भारतीयांसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ नाही. पण, वानुआतू त्यांच्या जागतिक दर्जाच्या डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि उच्च दर्जाच्या रिसॉर्ट्ससाठी ओळखले जाते.
जगातील चौथा सर्वात आनंदी देश
दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या वार्षिक हॅपी प्लॅनेट इंडेक्समध्ये वानुआतू चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या पुढे, फक्त कोस्टा रिका, मेक्सिको आणि कोलंबिया हे देश आहेत.
वानुआतूमध्ये १०० हून अधिक भाषा
डेव्हिड क्रिस्टल यांच्या ‘इंग्लिश अॅज अ ग्लोबल लँग्वेज’ या पुस्तकानुसार, जगभरात ४५ देश असे आहेत जिथे किमान अर्धी लोकसंख्या इंग्रजी बोलते. त्यामध्ये वानुआतूचाही समावेश आहे. याचबरोबर वानुआतूमध्ये १०० हून अधिक भाषा आढळतात. हा देश भाषिकदृष्ट्या जगातील सर्वात वैविध्यपूर्ण देश आहे.
एक कोटी रुपयांत मिळते वानुअतूचे नागरिकत्व
गोल्डन व्हिसाच्या माध्यमातून जगभरातील कोणालाही वानुअतूचे नागरिकत्व मिळवता येते. त्यासाठी एकदम सोपी आणि जलद प्रक्रिया आहे. नागरिकत्व मिळवण्यासाठी परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात ठरावीक प्रकारची गुंतवणूकही करावी लागते. वानुअतूचं नागरिकत्व मिळविण्यासाठी जवळपास १,३५,५०० ते १,५५,५०० डॉलर्स (भारतीय चलनात १.१८ कोटी ते १.३५ कोटी रुपये) पर्यंत खर्च येतो. त्यामध्ये चार जणांच्या कुटुंबासाठी नागरिकत्व खरेदी करण्याचे पर्यायदेखील आहे. अर्ज दाखल केल्यानंतर ही प्रक्रिया एक ते दोन महिन्यांत पूर्ण होते. २०१९ मध्ये बीबीसीनं वृत्त दिलं होतं की, वानुअतूच्या महसुलात गोल्डन व्हिसा विक्रीचा वाटा सुमारे ३०% इतका आहे.