भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या समभाग विक्रीकडे (आयपीओ) गुंतवणूदारांचे लक्ष लागले आहे. एआयसीचा आयपीओ लवकरच लॉन्च होणार आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. एलआयसीने रविवारी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (डीआरएचपी) दाखल केला आहे. सरकार कंपनीच्या पोस्ट ऑफर पेड-अप शेअर कॅपिटलमधील ४.९९ टक्के भागीदारी विकणार आहे. एलआयसी हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. त्यानुसार भारत सरकार ३१.६२ कोटी शेअर जारी करणार आहे. तुम्ही सुद्धा एलआयसीचा आयपीओ विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही कागदोपत्री पुर्तता करणं बंधनकारक ठरणार आहे. नक्की हा आयपीओ कसा असू शकतो आणि त्यासाठी कोणती तयारी करुन ठेवणं फायद्याचं ठरेल यावरच टाकलेली नजर…
जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी
२०२० मध्ये एलआयसीचा देशांतर्गत बाजारातील हिस्सा ६४.१ टक्क्यांहून अधिक होता. क्रिसिलच्या अहवालानुसार, जीवन विमा प्रीमियमच्या बाबतीत एलआयसी ही जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अहवालानुसार, २००० पूर्वीच्या काळात एलआयसीचा बाजारातील हिस्सा १०० टक्के होता, जो २०१६ मध्ये हळूहळू ७१.८ टक्क्यांवर आला. २०२० मध्ये, एलआयसीचा हिस्सा आणखी कमी होऊन ६४.१ टक्के झाला.
पॉलिसीधारकांसाठी १० टक्क्यांपर्यंत समभाग राखीव
३० सप्टेंबर २०२१ पर्यंत एलआयसीची एकूण संपत्ती ८,००० कोटी रुपये इतकी आहे. एलआयसी कायद्यानुसार, एलआयसीमध्ये केंद्राची भागीदारी ५१ टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. कोणताही गुंतवणूकदार, एकट्याने किंवा समुहाने एलआयसीमध्ये ५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा घेऊ शकत नाही, असेही या कायद्यात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारला यामध्ये अपवाद ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदार एलआयसीच्या सूचीमध्ये ५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा खरेदी करू शकत नाहीत. आयपीओचा एक भाग गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. तसेच, एलआयसीच्या आयपीओ इश्यूच्या १० टक्के पर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांना सवलतीत शेअर मिळण्याची शक्यता आहे. महामंडळाने सवलतीचे तपशील जाहीर केले नसले तरी, बाजाराचा अंदाज ऑफरच्या किमतीत पाच टक्के सवलत आहे. किमान ३५ टक्के इश्यू किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. एलआयसीने पॉलिसीधारकांना पॉलिसीशी पॅनकार्ड लिंक करण्यास आणि शेअर्ससाठी अर्ज करण्यासाठी डीमॅट खाते उघडण्यास सांगितले आहे.
खातं आणि पॅन लिंक करुन घेणं आवश्यक…
चालू आर्थिक वर्षासाठी सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टात ७८,००० कोटी रुपयांच्या तुटवड्याचा अंदाज असताना एलआसयीचा आयपीओ सरकारसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे सरकार हा आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे हा आयपीओ आणि त्याच्याशीसंबंधित सूट तसेच सवलतींचा फायदा घेण्याची सवुर्णसंधी पॉलिसीधारकांकडे आहे. त्यामुळेच एलआयसीची पॉलिसी असणाऱ्यांना या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल तर पॉलिसी, पॅन आणि डीमॅट खातं एकमेकांशी संलग्न करुन घेणं फायद्याचं ठरेल. हे कसं करता येईल जाणून घेऊयात…
> एलआयलीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
> तिथे होमपेजवर ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा.
> रजिस्ट्रेशन पेजवर प्रोसीडवर क्लिक करा.
> नवीन पेजवर पॅन, इमेल, मोबाइल नंबर आणि पॉलिसी नंबर अशी माहिती भरा.
> त्यानंतर कॅप्चा कोड योग्य पद्धतीने सबमीट करा.
> ओटीपी रिक्वेस्टवर क्लिक करा.
> तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
> हा ओटीपी वेबसाईटवर सबमीट करा.
> त्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीपद्धतीने करण्यात आल्याचा मेसेज येईल.
> एकदा जन्मतारीख, पॉलिसी क्रमांक आणि पॅन क्रमांक आवश्यक तपासून पाहा.
पॉलिसी लॅप्स झाली असेल तर…
एलआयसीकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ५ टक्के तर पॉलिसीधारकांसाठी १० टक्के शेअर्स राखीव ठेवले आहेत. तुमची पॉलिसी लॅप्स जाली असेल तर तुम्ही राखीव कोट्यातून बोली लावू शकता. त्याप्रमाणे एलआयसी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि पॉलिसीधारकांना सूटही देऊ शकते असाही अंदाज व्यक्त केला जातोय.