Vasuki Indicus: हिंदू पौराणिक कथांनुसार वासुकी या नागाला नागांचा राजा, असे म्हटले जाते. या वासुकी नागासंबंधित अनेक पौराणिक कथा आजही प्रचलित आहेत. एका कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी वासुकी नागालाच मंदार पर्वताभोवती गुंडाळून देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी दोन्ही बाजूंनी रशीप्रमाणे ओढले होते. त्याशिवाय भगवान महादेवांच्या गळ्यातही वासुकी नागाला स्थान मिळाले आहे. वासुकी या नागाच्या प्रजाती नष्ट होऊन अनेक वर्षे लोटली. पण, आता या सापाच्या प्रजातीचे अवशेष सापडले आहेत. पण, हा नाग पौराणिक कथांमधील तो वासुकी तर नाही ना?
संशोधकांनी लावला शोध
२०२४ मध्ये भारतीय संशोधकांनी ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी भारतात वावरणाऱ्या भल्यामोठ्या प्राचीन सापाच्या प्रजातीचा शोध लावला आहे. हा आतापर्यंत सर्वात जास्त काळ जगणाऱ्या सापांपैकी एक आहे. तो ४९ फुटांपेक्षाही लांब आणि आतापर्यंत नोंद केलेल्या भल्यामोठ्या अजगरांनाही मागे सारेल असे त्याचे वर्णन आहे.
‘वासुकी इंडिकस’ नाव कसे पडले?
२००४ मध्ये गुजरातमध्ये पहिल्यांदा या नागाचे अवशेष सापडले होते, जो सापांच्या उत्क्रांती आणि त्यांच्या प्राचीन अधिवासांना समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा शोध होता. परंतु, २०२४ मध्ये हे अवशेष भल्यामोठ्या नागाचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर झालेल्या संशोधनात या नागाचा आकार, निवासस्थान, वर्तन यांचा शोध घेण्यात आला. त्यामुळे या सापाचे नाव हिंदू पौराणिक कथांमधील पौराणिक साप असलेल्या वासुकीच्या नावावरून ‘वासुकी इंडिकस’ असे ठेवण्यात आले.
हा साप आता नामशेष झालेल्या मॅडत्सोइडे कुटुंबातील होता, जो आकाराने मोठा, बिनविषारी कन्स्ट्रक्टर सापांचा समूह आहे. या शोधामुळे त्याला सर्वांत लांब ज्ञात असलेल्या सापांच्या प्रजातींमध्ये स्थान मिळाले. जो टायटानोबोआशी स्पर्धा करतो, ६० दशलक्ष वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत वावरणारा ४२ फुटांचा भलामोठा साप होता.
सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, वासुकी इंडिकसच्या सांगाड्याच्या रचनेवरून असे दिसून येते की, तो आधुनिक अजगर आणि अॅनाकोंडासारखाच मंद गतीने फिरणारा घातक शिकारी साप होता.
वासुकी इंडिकस कशामुळे खास झाला?
आकार : अंदाजे ४९ फूट (१५ मीटर) लांब, ज्यामुळे तो आतापर्यंत सापडलेल्या सर्वांत मोठ्या सापांपैकी एक ठरला आहे.
युग : सुमारे ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी भारतात राहत होता.
अधिवास : जिथे आधुनिक अजगर आणि अॅनाकोंडा आढळतात त्याप्रमाणेच तो उबदार, दमट वातावरणात वाढतो, पाणवठ्यांजवळ राहत होता.
महत्त्व : भारतीय उपखंडातील समृद्ध प्रागैतिहासिक जैवविविधतेवर प्रकाश टाकते आणि प्राचीन भूभागांमध्ये सापांच्या प्रसाराच्या सिद्धान्ताला बळकटी देते.
हा शोध प्रागैतिहासिक संशोधनात भारताचे महत्त्व अधोरेखित करतो, ज्यामुळे देशातील महत्त्वपूर्ण जीवाश्म शोधांच्या वाढत्या यादीत भर पडते.