Maha Shivratri 2025: हिंदू पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह पार पडला होता. महाशिवरात्री २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी सुरू होईल तर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून ८ मिनिटांनी समाप्त होईल.
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात पूजा, पंचामृताने अभिषेक करतात, शिव लिंगासमोर धूप, दीप लावून आरती करतात, महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करतात. या दिवशी शिवभक्त उपवास धरतात. ठिकठिकाणी भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शंकर पार्वती आणि गणरायाची शोभा यात्रा काढली जाते. भारतात हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. पण, तुम्हाला माहितीये का भारत सोडून जगात असे सात देश आहेत, जिथे महाशिवरात्री उत्साहाने साजरी केली जाते.
त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago)
त्रिनिदाद आणि टोबॅगो हे कॅरिबियनमधील दक्षिणेकडील बेट देश आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर शिवाची पूजा केली जाते. शिवभक्त उपवास करतात आणि मंदिरात उत्सव साजरा करतात.
नेपाळ (Nepal)
नेपाळ या दक्षिण आशियाई देशात पशुपतिनाथ मंदिर आहे. हे मंदिर नेपाळची राजधानी काठमांडूपासून तीन किमी अंतरावर देवपाटन गावात बागमती नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री उत्साहाने साजरी केली जाते. या मंदिरात लोक प्रार्थना करण्यासाठी येतात. येथील लोक या दिवशी उपवास धरतात. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.
मॉरिशस (Mauritius)
मॉरिशसमध्ये हिंदू धर्माची लोकसंख्या जास्त आहे. तेथील हिंदू लोक महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात, मंदिरात जातात आणि शिवाची पूजा करतात. या दिवशी ते भव्य मिरवणुका काढतात.
बांगलादेश (Bangladesh)
एकेकाळी पाकिस्तानचा भाग असलेल्या बांगलादेशातसुद्धा महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी केली जाते. येथील शिवमंदिरात भक्त भेट देतात, प्रार्थना करतात आणि रात्रभर शिव स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करतात.
श्रीलंका (Sri Lanka)
श्रीलंकेत शिवाला महादेव, नटराज, भोलेनाथ इत्यादी नावाने ओळखले जाते. येथे शिवाची अनेक मंदिरं आहेत ज्यामध्ये कोनेश्वरम, मुन्नेश्वरम आणि कातिरगामा हे प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरांमध्ये या दिवशी विशेष पूजा केली जाते, मंदिर समितीकडून कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.
इंडोनेशिया (Indonesia)
इंडोनेशियामध्ये शिवाची अनेक मंदिरे आहेत. प्रम्बानन मंदिर, सिंघसरी शिव मंदिर आणि श्री शिव मंदिर इत्यादी. येथे शिवाला ‘बतारा गुरू’ म्हणून ओळखले जाते. इंडोनेशियातील बाली या सुंदर ठिकाणी हिंदू धर्माचा सर्वात जास्त प्रभाव आहे. या ठिकाणी राहणारे हिंदू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची पूजा आराधना करतात. मंदिरात विधी संपन्न करून उत्सव साजरा करतात.
फिजी (Fiji)
फिजी हा पॅसिफिक महासागरातील एक बेट देश आहे. येथे सर्वाधिक हिंदू लोक राहतात आणि तेथे फिजी हिंदी ही भाषा बोलली जाते. येथील श्री शिव सुब्रमण्याम मंदिर अतिशय सुंदर आहे. शिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात उत्सव साजरा केला जातो.