कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो. महाकुंभमेळा हा हिंदू कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, जो दर १२ वर्षांनी प्रयागराज येथे आयोजित केला जातो. जिथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्या एकत्र येतात. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. १४४ वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याचे प्रतीक असलेल्या महाकुंभ २०२५ साठी आतापर्यंत सुमारे सात कोटी भाविक जमले आहेत.
प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. प्रयागराज ही नद्यांच्या तसेच संस्कृतींच्या संगमाची भूमी आहे, ज्याला कधी इलावर्त, कधी इलाबास असे म्हटले जात असे. हे इलावास या नावाचा अपभ्रंश होत नंतर ते इलाहवास झाले आणि नंतर अलाहाबादमध्ये झाले आणि त्याला अलाहाबाद असेही म्हटले जाऊ लागले.
पण, ‘प्रयागराज’चा अर्थ काय आहे आणि त्या ठिकाणाचे नाव असे का ठेवले गेले आहे? चला जाणून घेऊया.
‘टाईम्स नाऊ’ या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “वेदांच्या अस्तित्वापूर्वीही, प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा साजरा केला जात असे.” व्हिडीओमध्ये पुढे स्पष्ट केले आहे की, “‘प्र’ या शब्दाचा अर्थ ‘प्रथम’ (पहिला) आणि ‘याग’ म्हणजे ‘यज्ञ’ असा होतो. भगवान ब्रह्मदेवाने अक्षय वट जवळ विश्वातील पहिला यज्ञ केला होता आणि त्या ठिकाणाचे नाव प्रयाग पडले. कालांतराने संपूर्ण परिसर प्रयागराज म्हणून ओळखला जाऊ लागला.”
महाकुंभ मेळा
मोक्ष (मुक्ती) मिळवण्याकरिता संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी लाखो हजारो भाविक हजेरी लावत आहेत. जगातील सर्वात मोठ्या मानवी मेळाव्याच्या आध्यात्मिक उत्साहात मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटकदेखील सहभागी झाले आहेत. पौष पौर्णिमेच्या शाही स्नानाने सोमवारी (१३ जानेवारी) सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यामुळे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमाचे रूपांतर श्रद्धा, संस्कृती आणि मानवतेच्या चैतन्यशील स्थानामध्ये केले आहे. दर १४४ वर्षांनी एकदा होणार्या या दुर्मीळ संयोगामुळे जगभरातील लोकांनी येथे भेट दिली आहे.
२६ फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ४०-४५ कोटी पर्यटक मोठ्या संख्येने येण्याची तयारी उत्तर प्रदेश सरकार करत आहे. सर्वकाही सुरळीत पार पडावे यासाठी अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात संसाधने एकत्रित केली आहेत.