Maharashtra Bhushan Award Full List : जगभरात भारताची मान अभिमानानं उंचावणारा गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात याबाबतची घोषणा केली. राम सुतार यानी आतापर्यंत अनेक भव्य व सुंदर पुतळे, मूर्ती व शिल्प साकारली आहेत. त्याचबरोबर मालवण येथे उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे.
दरम्यान, हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी सुरू झाला? कोणी सुरू केला? यामागची संकल्पना कोणाची होती? पुरस्काराचं स्वरुप काय असतं? आतापर्यंत हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला आहे? असे काही प्रश्न अनेकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला जातो?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. सुरुवातीला हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा व विज्ञान या क्षेत्रांमधील विशेष कामगिरीसाठी दिला जात होता. नंतर यामध्ये समाजसेवा, पत्रकारिता, प्रशासन आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला सध्या रोख २५ लाख रुपये, स्मतीचिन्ह व प्रशस्तीपत्र दिलं जातं. विजेत्याची निवड करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे.
पुरस्काराची सुरुवात कधी व कोणी केली?
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात १९९५ मध्ये झाली. तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत होतं. या युतीने आपल्या कार्यकाळात हा पुरस्कार सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. १९९६ साली पहिल्यांदा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रयत्नातून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. दरवर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी किंवा त्या दिवसाच्या आसपास हा पुरस्कार प्रदान केला जातो.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांची यादी
वर्ष | विजेते | क्षेत्र |
१९८६ | पु. ल. देशपांडे | साहित्य – लेखक, नाटककार |
१९९७ | लता मंगेशकर | कला – गायन, संगीत |
१९९८ | विजय भाटकर | विज्ञान (‘परम’ या सुपर कॉम्प्युटरचे निर्माते) |
१९९९ | सुनील गावस्कर | क्रीडा – क्रिकेट |
२००० | धनंजय गाडगीळ | विज्ञान – खगोलशास्त्रज्ञ |
२००१ | सचिन तेंडुलकर | क्रीडा – क्रिकेट |
२००२ | भीमसेन जोशी | कला – शास्त्रीय संगीत |
२००३ | अनिल काकोडकर | विज्ञान – अणुशास्त्रज्ञ |
२००४ | रघुनाथ माशेलकर | विज्ञान – रसायनशास्त्र |
२००५ | जयंत नारळीकर | विज्ञान – खगोलशास्त्रज्ञ |
२००६ | मंगेश पाडगावकर | साहित्य – कवी |
२००७ | रवीशंकर रावळ | कला – चित्रकला |
२००८ | नानासाहेब धर्माधिकारी | समाजसेवा |
२००९ | विजय मर्चंट | क्रीडा – क्रिकेट |
२०१० | बाबासाहेब पुरंदरे | साहित्य – इतिहास |
२०११ | प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे | समाजसेवा |
२०१५ | चंद्रशेखर धर्माधिकारी | प्रशासन |
२०२१ | आशा भोसले | कला – संंगीत |
२०२२ | आप्पासाहेब धर्माधिकारी | समाजसेवा |
२०२३ | अशोक सराफ | कला – अभिनय |
२०२५ | राम सुतार | कला – शिल्पकार |