महाराष्ट्रातील अकोला येथील मूर्तिजापूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले संभाषण नवरदेवाचा सिबिल स्कोअर कमी असल्याने तुटले आहे. मूर्तिजापूर येथे घडलेल्या या घटनेने विवाहांमध्ये आर्थिक घटकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, असे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. नेमके हे प्रकरण काय? सिबिल स्कोअर म्हणजे काय? तो इतका महत्त्वाचा का आणि तो कसा सुधारायचा? याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रकरण काय?
मूर्तिजापूरमध्ये कुटुंबांनी संभाषणातून वधू आणि वराच्या लग्नास सहमती दर्शवली. परंतु, जेव्हा वधूच्या काकांनी वराचा सिबिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला तेव्हा परिस्थिती अचानक बदलली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, वराचा आर्थिक इतिहास बघताच लग्न तोडण्यात आले. मुलाचा सिबिल स्कोअर बघून मुलीचे काका नाखूष होते. वराकडे वेगवेगळ्या बँकांकडून अनेक कर्जे होती आणि त्याचा सिबिल स्कोअर खूपच कमी होता. कमी सिबिल स्कोअर सामान्यत: खराब क्रेडिट व्यवस्थापन दर्शवतो; जसे की थकीत पेमेंट, जे संभाव्य आर्थिक अस्थिरतेचे संकेत देते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी एकमताने काकांची चिंता समजून निर्णय मान्य केला. परिणामी, त्यांनी लग्नाचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला.
सिबिल स्कोअर म्हणजे काय?
सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० पर्यंतचा तीन अंकी क्रमांक असतो, जो एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास दर्शवतो. जास्त स्कोअर आर्थिक स्थैर्य दर्शवतात, तर कमी स्कोअर आर्थिक अडचणी सूचित करतात. जेव्हा बँक किंवा इतर वित्तीय संस्था कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्याचा विचार करतात, तेव्हा ते सर्वप्रथम आपला सिबिल स्कोअर तपासतात. सिबिल ही भारतातील सर्वात जुनी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या परवान्याखाली काम करते. ही एजन्सी व्यक्ती आणि व्यवसायांद्वारे कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या परतफेडीचा मागोवा घेते. बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांच्या डेटाच्या आधारे दर महिन्याला तुमची माहिती अपडेट केली जाते.
कंपनी क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (CIR) तयार करते; ज्यामध्ये तुमचा कर्ज परतफेड इतिहास, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि चालू कर्जे यांसारख्या तपशिलांचा समावेश असतो. अहवालात तुमचा रोजगार इतिहास आणि कर्जाची चौकशी यांसारखी माहितीदेखील असते. तुमच्या क्रेडिटचा मागोवा ठेवण्यासाठी आणि कोणत्याही त्रुटी शोधण्यासाठी तुम्ही तुमचा सिबिल अहवाल त्यांच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.
सिबिल स्कोअर आणि त्याचा कर्ज मंजुरीवर होणारा परिणाम
सिबिल तुम्हाला क्रेडिट स्कोअर प्रदान करते. अगदी कंपन्यांनाही व्यावसायिक सिबिल स्कोअर असतो. तुमच्या क्रेडिट सवयींवर आधारित तुमचा स्कोअर बदलू शकतो. उदाहरणार्थ, ईएमआय पेमेंट थकीत असणे किंवा अल्प कालावधीत कर्जाच्या अनेक चौकशी केल्याने तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो. दुसरीकडे तुमचा ईएमआय वेळेवर भरणे, कर्जाचे प्रीपेमेंट करणे किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी भरणे आदींमुळे तुमचा स्कोअर सुधारू शकतो.
तुम्ही कर्ज किंवा क्रेडिटसाठी अर्ज करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर तुमच्या क्रेडिट योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे वैयक्तिक कर्जासह कोणत्याही प्रकारच्या क्रेडिटसाठी तुमच्या मंजुरीच्या शक्यता सुधारण्यासाठी चांगला स्कोअर राखणे आवश्यक आहे. सिबिल नियमितपणे तपासणे आणि तुमचा स्कोअर जास्त आहे याची खात्री करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
सिबिल कसे काम करते?
भारतातील पहिली क्रेडिट माहिती कंपनी ‘सिबिल’ ऑगस्ट २००० मध्ये स्थापन करण्यात आली. या कंपनीचे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका, एनबीएफसी आणि इतर वित्तीय संस्थांसह सुमारे ९०० सदस्य आहेत. क्रेडिट स्कोअर आणि अहवाल तयार करण्यासाठी या माहितीचा वापर करून सिबिल ग्राहक आणि व्यावसायिक क्रेडिटवरील डेटा संकलित करते आणि देखरेख करते. कर्ज देणारे हे स्कोअर क्रेडिट कर्जाची परतफेड करण्याची क्षमता तपासण्यासाठी वापरतात.
सिबिलने आर्थिक माहितीचे प्रमुख डन आणि ब्रॅडस्ट्रीट आणि जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी ट्रान्स युनियन इंटरनॅशनलबरोबर भागीदारी केली आहे. सिबिल हे ISO 27001:2005 प्रमाणित आहे, यामुळे सिबिलमधील माहितीची उच्च सुरक्षा सुनिश्चित होते. कर्जदारांच्या प्रोफाइलचे मूल्यांकन करण्यासाठी सिबिल स्कोअर सामान्यतः बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात वापरले जातात. सिबिल दोन क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. एक म्हणजे ग्राहक ब्युरो, जो २६० दशलक्ष वैयक्तिक क्रेडिट रेकॉर्डचा मागोवा ठेवतो आणि दुसरे म्हणजे व्यावसायिक ब्युरो, जो व्यवसायांसाठी १२ दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड हाताळतो.
सिबिल स्कोअर सुधारायचा कसा?
कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज करणे टाळा
क्रेडिट इन्क्वायरीचे दोन प्रकार असतात. ते म्हणजे सॉफ्ट आणि हार्ड. जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा क्रेडिट स्कोअर तपासता, तेव्हा तो सॉफ्ट इन्क्वायरीचा भाग असतो. त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत नाही. पण, जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था किंवा क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्या क्रेडिट अर्जाचा भाग म्हणून तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासते तेव्हा हा हार्ड इन्क्वायरीचा भाग होतो. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो आणि वारंवार चौकशी केल्याने स्कोअर कमी होऊ शकतो.
बँक किंवा वित्तीय संस्था वारंवार अर्ज करण्याला आर्थिक अडचणीचे लक्षण म्हणून पाहू शकतात. परिणामी, ते तुमचा अर्ज नाकारू शकतात. क्रेडिट ब्युरोदेखील अल्पावधीत अनेक हार्ड इन्क्वायरीची नोंद झाल्यास तुमचा स्कोअर कमी करतात. तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करत असल्यास तुमचे संशोधन करणे, पर्यायांची तुलना करणे आणि एकावेळी फक्त एकाच कर्जदात्याला अर्ज करणे योग्य ठरेल. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, तुमच्या मंजुरीची शक्यता वाढवण्यासाठी क्रेडिटसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यात सुधारणा करण्याचा विचार करा.
क्रेडिट कार्ड किंवा कर्जाची परतफेड वेळेवर करा
देय तारखेपर्यंत तुमचे क्रेडिट कार्ड शिल्लक भरण्यास प्राधान्य द्या. थकबाकी तुमच्या सिबिल स्कोअरवर गंभीर परिणाम करू शकते आणि वारंवार थकबाकी राहिल्यास तुमचा स्कोअर सहज ६०० च्या खाली जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही पेमेंट चुकवता, तेव्हा त्याची नोंद तुमच्या सिबिल रिपोर्टच्या ‘डेज पास्ट ड्यू’ (DPD) विभागात केली जाते. तुम्ही देय तारखेपर्यंत पूर्ण रक्कम भरू शकत नसल्यास किमान देय रक्कम भरण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे कार्ड प्रदाते चुकवलेल्या पेमेंटची तक्रार क्रेडिट ब्युरोकडे करणार नाही.
तुमची क्रेडिट मर्यादा वाढवण्याचा विचार करा
क्रेडिट कार्ड कंपन्या अनेकदा तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर आधारित तुमची क्रेडिट मर्यादा वाढवण्याचा पर्याय देतात. तुम्हाला तुमची मर्यादा वाढवण्याची संधी दिल्यास, ती संधी घेणे योग्य ठरेल. त्यामुळे तुम्हाला आवश्यकतेनुसार क्रेडिट वापरण्यासाठी अधिक लवचिकता मिळते. तुमची क्रेडिट मर्यादा वाढवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दरमहा अधिक खर्च केला पाहिजे. त्याऐवजी यामुळे तुम्हाला तुमचा क्रेडिट वापर कमी करण्यास मदत होते. तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम करण्यासाठी तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो ३० टक्केपेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तुमचा क्रेडिट वापर जास्त असला तरीही जोपर्यंत तुम्ही वेळेवर पेमेंट करत आहात, क्रेडिट ब्युरो तुम्हाला दंड करणार नाही.