Mahashivratri What Are Different Types Of Fasting: सण आणि खाणे हे तर अगदी परममित्रच म्हणावे लागतील. आपल्याकडे वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या पदार्थांचे महत्त्व असते. यात अनेक सणांमध्ये उपवास करणे ही आपली प्रथा आहे. एकादशी आणि दुप्पट खाशी अशा म्हणी सुद्धा यातूनच सुरु झाल्या. उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक जण उपवास करणार असतील. तुम्ही हा शब्द उच्चारताना नेमकं काय म्हणता? उपवास की उपास? हे दोन्ही शब्द अपभ्रंश होऊन नाही तर अर्थानेच वेगवेगळे आहेत. आज आपण या दोन्हीचे अर्थ जाणून घेऊयात आणि मग त्यानुसार येत्या सर्व व्रतवैकल्यांमध्ये आपण नेमकं काय करायचं हा निर्णय घेऊ शकता.
उपास व उपवास यातील फरक काय?
आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे यांच्या माहितीनुसार, उपास करणे म्हणजे उपाशी राहणे. आणि दुसरा म्हणजे उपवास ज्यामध्ये आपण उपवासाचे पदार्थ खातो. यामध्ये आपण भगवंताचे नामःस्मरण करुन मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. हे दोन्ही प्रकार जर एकत्र मनाशी आले तर तो खरा भगवंतापर्यंत पोहोचला असं म्हणता येते. म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ न खाता उप म्हणचे जवळ आणि वास म्हणजे सहवास, भगवंताच्या मनाने सहवासात राहणे, याला उपवास करणे म्हणतात.
आपल्याकडे काही व्रतांना पूर्ण उपास केला जातो. तर एकादशीच्या दिवशी उपवास म्हणजेच मर्यादित खाऊन देवभक्ती करणे महत्त्वाचे असते. या दोन्ही बाबीत आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
१. उपवासाचे पदार्थ खाताना व उपास करताना तब्येतीची काळजी घेऊन करावा. ज्यांना मधुमेह, रक्तदाब यांसारखे त्रास आहेत त्यांनी शक्यतो उपवास करणे टाळावे.
२. पित्ताचा त्रास असेल तर उपवासाचे पदार्थ जरा जपून खावेत. उपाशी पोटी आंबट पदार्थ खाल्याने पित्त वाढते.
३. उपवासामध्ये राजगिरा, दूध, रताळे यांचा वापर उत्तम. फळे, ताक, दही, काकडी यांचाही समावेश ठेवावा.
हे ही वाचा<< ७०० वर्षांनी महाशिवरात्रीला जुळून आले पाच महायोग; ‘या’ शुभ मुहूर्तापासून बक्कळ धनलाभाची संधी
४. ढगाळ हवेला जड पदार्थ पचत नाहीत म्हणून हलका आहार घ्यावा. त्यामुळे श्रावणातील उपवासांना जड आणि तळलेले पदार्थ टाळणे उत्तम.
५. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे निर्जळी म्हणजे पाणी न पिता उपवास करणे हे अजिबात योग्य नाही.
साधारण यावरूनच उपास करता करता ‘उपवास’ करणे उत्तम ठरेल. जर तुम्ही परमेश्वरासाठी उपवास करत असाल तर त्यासाठी त्याचे स्मरण, त्याच्याशी साधलेला संवाद आणि त्याच्या पवित्र विचारांचा मनन गरजेचे असते.