Mahashivratri 2023 White Flowers for Mahadev: महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा असा सण आहे. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. येत्या शनिवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी महादेवांची महाशिवरात्र साजरी केली जाईल. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केली जाते. शंकराला विशेष प्रसाद दाखवला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून देशातील भाविक शंकराची अत्यंत वेगळेपणाने या खास दिवशी पूजा करतात. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. भगवान शिव शंकराला भोळा शंकर असे देखील म्हटले जाते. पण शिवाला पांढरी फुलेच प्रिय का? यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया यामागचे कारण…
महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी दिसून येते. बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत, तेथे लाखोच्या संख्येने भाविक भक्त शिव दर्शनाला येतात. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, तेथे मोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला १०८ बेल वाहून शिव नामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्त उपवास करून दूध आणि फळे कंदमुळे असा आहार घेतात. भारताच्या विविध राज्यात हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभर विविध तीर्थक्षेत्र तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाचे स्थानी विशेष यात्रा भरतात.
(हे ही वाचा : महादेवाला बेलच सर्वाधिक प्रिय का? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल )
महादेवाला कोणकोणते फुले वाहतात?
जरी, कोणत्याही प्रकारचे फूल अद्याप कोणत्याही देवाला अर्पण केले जाऊ शकते, परंतु अशी काही फुले आहेत जी हिंदू देवतांची आवडती फुले आहेत जी हिंदू देव आणि देवतांना अर्पण केल्यास तुम्हाला सौभाग्य प्राप्त होऊ शकते, असे मानले जाते. भगवान शिवाला काही फुले खूपच प्रिय आहेत. भगवान शंकराला धोतऱ्याची फुले, हरसिंगार, नागकेशराची पंढरी फुले, सुके कमळाचे गट्टे, कणेर, कुसुम, आक, कुश इत्यादींची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. भगवान शंकराला धोतऱ्याची फुले सर्वाधिक प्रिय आहेत.
शिवाला पांढरी फुलेच प्रिय का?
शिवाचा आवडता रंग पांढरा आहे. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण केले जाते. महादेवाला शक्यतो पांढरी अथवा निळी फुले वाहतात जसे की मोगरे, पारिजात, गोकर्ण, तगर, धोत्रा. पांढरी फुले उपासना म्हणून वापरली जातात. प्रत्येक देवाला काय आवडते हे आपल्या पूर्वजांनी ठरवले आहे त्या प्रमाणे महादेवाला पांढरेशुभ्र फुल आवडते आणि त्रिशुळा सारखी तीन पाने असलेला बेल हा लागतो, तरीही मनोभावे वाहिलेले कोणत्याही रंगाचे फुल आपण वाहू शकतो, देवाला केवळ भक्तिभाव लागतो. महादेवाला पांढरी फुले प्रिय आहेत कारण पांढरा रंग हा मनातील खळबळ शांत करतो.