Gandhi Jayanti 2023: जगाला अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींची जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. गांधीजींनी केलेल्या कार्यासाठी जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचाच जन्म दिवस म्हणजेच २ ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्तरावर साजरा होतो. महात्मा गांधी यांच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल आपण ऐकले असेल पण ज्या बळावर त्यांना हे कार्य करण्याची शक्ती व प्रेरणा मिळाली असा शिक्षणाचा पाया किती मजबूत होता हे तुम्हाला माहित आहे का? आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त आपण बापूंच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा घेऊया..
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला होता त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी पोरबंदर येथे झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते असले तरी महात्मा गांधी हे शाळेत मात्र सामान्य विद्यार्थी होते. त्यांना खेळातही फार रस नव्हता . महात्मा गांधींवरील एका अहवालात नमूद केले आहे की, “ते इंग्रजीत चांगले होते, गणितात चांगले होते पण भूगोलात फार हुशार नव्हते, त्यांची वर्तणूक अत्यंत शिस्तप्रिय होती पण अक्षर फार वाईट होते, त्यांचा स्वभाव काहीसा लाजाळू होता.”
प्राथमिक शिक्षणनंतर वडिलांच्या नवीन नोकरीमुळे गांधीजी राजकोटला गेले. ११ व्या वर्षी, त्यांनी अल्फ्रेड हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी इंग्रजीसह अनेक विषयांमध्ये प्राविण्य मिळवले. गांधीजींनी विविध विषयांमध्ये प्राविण्य मिळवूनही हस्ताक्षर मात्र कधीच सुधारले नाही, कारण ते सुरुवातीलाच धुळीवर लिहून शिकले होते. २०१७ मध्ये गांधींनी शिक्षण घेतलेल्या शाळेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले.
वयाच्या १३ व्या वर्षी त्याचे लग्न झाले, ज्यामुळे त्यांच्या हायस्कूलच्या शिक्षणात एका वर्षाचा ब्रेक झाला होता मात्र पुढे अधिक मेहनत घेऊन त्यांनी झालेले नुकसान भरून काढले.
हे ही वाचा<< Gandhi Jayanti 2023 : मोहनदास गांधी ते राष्ट्रपिता…कसा होता महात्मा गांधींचा जीवनप्रवास?
उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना सामलदास कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला, त्या काळात या प्रदेशात पदवी प्रदान करणारे ते एकमेव ठिकाण होते. काही काळानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याचे ठरवले. यासाठी कुटुंब मागे सोडण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीका झाली होती मात्र तरीही त्यांनी १८८८ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) मध्ये प्रवेश घेतला आणि तीन वर्षांत त्यांनी कायद्याची पदवी पूर्ण केली.