India first village Mana on India-China border : तुम्हाला भारतीय सीमारेषेवरील पहिले गाव कोणते आहे हे माहिती आहे का? माहीत नसेल तर काळजी करू नका, याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. आजच्या तारखेला भारताचे पहिले गाव उत्तराखंडमधील माणा हे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने सोमवारी (२४ एप्रिल रोजी) सीमावर्ती गाव माणाच्या वेशीवर एक नवा फलक लावला, ज्यावर ‘पहिले भारतीय गाव’ असे लिहिले आहे.
उत्तराखंडमधील या माणा गावाबाबत आणखी एक विशेष गोष्ट तुम्हाला माहितीये का? उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवर असलेले माणा हे गाव, पूर्वी शेवटचे भारतीय गाव म्हणून ओळखले जात होते पण आता हे ‘पहिले भारतीय गाव’ म्हणून ओळखले जाईल.
माणा देशातील शेवटचे नव्हे पहिले गाव : मुख्यमंत्री धामी
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीने सोशल मीडियावर फोटो शेअर करीत सांगितले की, ”आता माणा देशातील शेवटचे नव्हे पहिले गाव म्हणून पाहिले जाईल. ”
धामी म्हणाले, ‘गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमावर्ती गाव माणा हे देशाचे पहिले गाव म्हणून संबोधित केले होते आणि आमचे सरकार सीमावर्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच समर्पित आहे. ”
सीमेवरील प्रत्येक गाव हे देशातील पहिले गाव : पंतप्रधान मोदी
२१ ऑक्टोबर२०२२ रोजी माणा येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना माणा हे भारतातील शेवटचे गाव न म्हणता देशातील पहिले गाव म्हणत शिक्कामोर्तब केले होते आणि म्हटले होते की, ”आता त्यांच्यासाठी सीमेवर वसलेले प्रत्येक गाव देशातील पहिले गाव आहे.”
ते म्हणाले होते की, “आधी ज्या भागांकडे देशाच्या सीमारेषा शेवटच्या मानून दुर्लक्षित केले जात होते, आम्ही तेथून ही देशाच्या समृद्धीची सुरुवात मानायला हवी. लोकांनी माणामध्ये यावे, येथे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.”
काय आहे व्हायब्रंट व्हिलेज’ उपक्रम?
मुख्यमंत्री धामी म्हणाले की, ”पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील सीमावर्ती भाग अधिक चैतन्यशील होत आहे. यासाठी व्हायब्रंट व्हिलेज उपक्रम सुरू करण्यात आला आहे.”
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संसदेतील अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख असलेल्या ‘व्हायब्रंट व्हिलेज’ योजनेचे उद्दिष्ट १९ जिल्हे, ४ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश – अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्किम, उत्तरेकडील सीमेवर उत्तराखंड आणि लडाखमधील ४६ सीमा ब्लॉकमधील गावांचा विकास करण्याचे आहे.
काय आहे व्हायब्रंट व्हिलेज’ उपक्रमाचा उद्देश?
धामी यांनी सांगितले की, ‘व्हायब्रंट व्हिलेज’ उपक्रमाचा उद्देश सीमावर्ती गावांचा विकास करणे, गावकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, स्थानिक संस्कृती, पारंपरिक ज्ञान आणि वारसा यांचा प्रचार करून पर्यटन क्षमतेचा उपयोग करणे आणि समुदाय-आधारित संस्था, सहकारी आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देणे हे आहे.
“एक गाव, एक उत्पादन’ या संकल्पनेवर इको-सस्टेनेबल इको-कृषी-व्यवसाय विकसित करणे हे देखील या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. ‘जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या सहकार्याने व्हायब्रंट व्हिलेज कृती आराखडा तयार केला आहे.” असे धामी यांनी सांगितले.
सीमावर्ती भागातील स्थलांतर रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल व्हायब्रंट व्हिलेज’ उपक्रम
ही योजना सीमावर्ती भागातील स्थलांतर रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, “एकविसाव्या शतकातील तिसरे दशक हे उत्तराखंडचे आहे, असे पंतप्रधान मोदींचे विधान आपल्यामध्ये नवीन उत्साह आणि ऊर्जेने भरते. आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव आहे.”
‘माणा’ गावाबद्दल जाणून घ्या!
- उत्तराखंडच्या पर्यटन वेबसाइटनुसार, राज्य सरकारने माणा या गावाला “पर्यटन गाव” म्हणून संबोधले आहे, आणि ते सरस्वती नदीच्या काठावर, बद्रीनाथ शहरापासून फक्त तीन किमी अंतरावर आहे, ज्यामुळे ते सर्वोत्तम पर्यटनांपैकी एक ठरले आहे. माणा हे गाव बद्रीनाथजवळ आहे आणि बद्रीनाथच्या दर्शनासाठी जाणारे भाविक पर्यटनासाठी माणा गावात जातात.
- सुमारे ३१२ मीटर उंचीवर वसलेले हे गाव निसर्गरम्य हिमालयीन टेकड्यांनी वेढलेले आहे, जे मनमोहक दृश्य पाहण्याची संधी देते.
- माणा गावात राहणारे लोक भोटिया समुदायाचे, मंगोल जमातीचे आहेत. ते सुंदरपणे सजवलेल्या आणि कोरलेल्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात.
- माणा हे लोकरीचे कपडे आणि साहित्यासाठी प्रसिद्ध आहे, जे प्रामुख्याने मेंढीच्या लोकरीपासून बनवले जातात. याव्यतिरिक्त, हे गाव बटाटे आणि राजमासाठीही प्रसिद्ध आहे.