‘मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे’चा काळ मागे पडून मराठी राजभाषा झाली. त्यालाही बरीच वर्ष झाली. पण आजच्या घडीला मराठी भाषेची अवस्था चांगली आहे असं कोणी छातीठोकपणे म्हणेल का? महाराष्ट्राच्या खंद्या शिलेदारांनी जिवाची बाजी लावत अटकेपार नेलेले मराठी झेंडे आजही आपल्या सर्वांच्या मनात फडकत आहेत हे खरंय. पण आपल्या मनातल्या या भावना शब्दबद्ध होताना त्याच सच्चेपणाने (किंवा त्या भाषेतही) आपल्यापर्यंत पोचतात का? हाही एक प्रश्न… मराठ्यांचं राज्य अटकेपार गेलं त्यावेळी सबंध भारतातल्या पहिल्या तीन भाषांमध्ये मराठीचं स्थान बळकट होतं. आज ती दहाव्या स्थानावर आहे. पण, आपल्या मनात मराठी कितव्या स्थानावर?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीय पक्षांनी भाजलेल्या पोळ्या असोत किंवा सामान्य जनतेच्या वरवरच्या पातळीवर केलेला माॅडर्न होण्याचा प्रयत्न असो, नुकसान मराठी भाषेचंच झालं. आपल्या मराठी भाषेबाबत आपली मान अभिमानाने उंच करणाऱ्या काही गोष्टी वाचा.

१. पाकिस्तानमध्ये कराची शहरात असलेली प्रतिष्ठित एन जे व्ही हायस्कूलचं पूर्ण नाव नारायण जगन्नाथ हायस्कूल असं आहे. मराठमोळ्या नारायण जगन्नाथ यांनी १८५५ साली ही शाळा स्थापन केली होती. स्वातंत्र्याआधी मुंबई आणि कराची ही दोन्ही शहरं एकाच प्रांतात येत असल्याने अनेक मराठी भाषिकांची कराचीमध्ये ये-जा होती.

२. मराठीभाषिक फक्त महाराष्ट्रातच राहतात असं नाही तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या कर्नाटक, गोवा, गुजरात, छत्तीसगढ आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्येच नाही तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये लाखोंच्या संख्येने मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक आहेत. आणि हे मराठीभाषिक समाज गेली कित्येक पिढ्या या प्रांतांमध्ये राहत आहेत.

३. मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी नाळ असणारे समाज पाकिस्तान आणि थेट अफगाणिस्तानात आजही आहेत असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? पण हे खरं आहे. पाक आणि अफगाणिस्तानातल्या बुगती, मारी तसंच बलोच समाजाची मुळं महाराष्ट्रातली आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर विखुरलेल्या मराठा सैन्यातले अनेक गट वेगवगळ्या प्रांतात स्थिरावले. आता नव्या नावांनी ओळखले जाणारे हे समाज अशाप्रकारे महाराष्ट्रीयन वंशाचे आहेत.

हे असं सगळं असतानाही मराठी भाषेला अस्तित्त्वाची लढाई करण्याची वेळ का यावी? मराठी भाषा टिकवायची असेल तर नक्की कुठला दृष्टिकोन हवा? इंग्लिश, हिंदी किंवा इतरही भाषा शिकायला हव्यात हे बाब कधीच स्पष्ट झाली आहे. मग नक्की काय करायचं? मराठीचा कोरडा जयघोष करत, उन्मादाच्या पडद्याखाली मराठी समाजाचं व्यवच्छेदक लक्षण मानला जाणारा न्यूनगंड बाळगत जगाला दूर लोटत रहायचं? नाहीतर दुसऱ्या टोकाला जात मराठीचा त्यागच करायचा?

‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ हा मराठी बाणा आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये धडाडी दाखवायला उपयोगी पडत असला तरी एखादी गोष्ट जमली नाही तर उपाशीच राहण्याची गरज नसते. थेट चढाई करून, आपलं सर्वस्व पणाला लावूनही पदरी पराभव आला तर आपण लगेच न्यूनगंडात जातो. पानिपतापासून हा न्यूनगंड तयार वगैरे झाल्याचं सांगितलं जातं. पण त्या पराभवानंतरही खचून न जाता पुढच्या दहा वर्षांनी मराठ्यांनी आपली सत्ता उत्तर भारतात पुन्हा प्रस्थापित केली होती हेही आपण विसरता कामा नये. एखादे वेळी तूप मिळालं नाही तर मिठाशी भाकर खात मराठमोळ्या मावळ्यांनी उपसलेल्या कष्टांच्या जोरावरच मराठी साम्राज्याचं तोरण उभं राहिलं. त्यामुळे मुळात आपल्या मनात असलेल्या न्यूनगंडाची कारणं बाह्य जगात शोधण्यापेक्षा या न्यूनगंडावरच काहीतरी जालीम उपाय शोधायचा का?

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi bhasha diwas marathi bhasha din few things about marathi language bmh