Marathi : महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती. या वर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर हा दर्जा आपल्या मराठी भाषेला दिला आहे. भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे आणि जगात ८३ दशलक्ष पेक्षा अधिक लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेतही सुमारे ४० हून अधिक बोली भाषांचा समावेश आहे. मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन हे दोन दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. जाणून घेऊ या दोन्ही दिवसांमधला फरक काय आहे?
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो?
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचं संवर्धन आणि गौरव करणं हे या दिवसाचं मुख्य औचित्य आहे. तसंच कुसुमाग्रज यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला जातो. एखाद्या कवीच्या जयंतीच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरं करणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या जयंती दिनीच साजरा केला जातो कारण या भाषेसाठीचं कुसुमाग्रज यांचं योगदान खूप मोठं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रजांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून २७ फेब्रुवारीलाच मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी राजभाषा दिन म्हणजे काय?
मराठी राजभाषा दिन १ मे रोजी साजरा केला जातो. यामागे एक विशेष कारण आहे. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी या भाषेला याच दिवशी राजभाषा म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर वसंतराव नाईक सरकारने १९६५ मध्ये १ मे हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करावा हा ठराव मांडला.यासंदर्भातला अधिनियम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १९६६ पासून तो अंमलात आला. तेव्हापासून म्हणजेच १ मे १९६६ पासून अर्थात मागच्या ५९ वर्षांपासून १ मे या दिवशी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येतो.
मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी संतांनी सर्वात मोठं योगदान दिलं आहे. त्यानंतर यात सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे तो साहित्यिकांचा. मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीला म्हणजेच कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. मात्र काहीजण या दिवसालाच मराठी राजभाषा दिन म्हणतात. मात्र ते तसं नाही. या दोन्हीमध्ये फरक काय आहे तेच आपण आत्ता समजून घेतलं आहे.