सध्या लग्नाचा सीझन संपत आला आहे. आपल्या देशामध्ये लग्नसमारंभामध्ये फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साखरपुडा, हळद ते लग्न अशा प्रत्येक धार्मिक विधीमध्ये वेगवेगळी फुलं पाहायला मिळतात. लग्नाच्या शुभमुहूर्तावर जेव्हा भटजी शुभमंगल सावधान म्हणतात, त्यावेळी नवरा आणि नवरी एकमेकांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घालतात. या विधीला लग्नामध्ये खास महत्त्व असते. पण हा कार्यक्रम सुरु असताना वधूवराच्या गळ्यात असणाऱ्या हारांना वरमाला का म्हणतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? या प्रश्नाचं उत्तर Mythologist देवदत्त पटनायक यांनी सांगितले आहे.
लग्नामध्ये एकमेकांना फुलांचे हार का घातले जातात?
हिंदू धर्मानुसार, लग्नामध्ये वर आणि वधू एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालतात. त्यांनी समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचा स्वीकार केला आहे असे त्या कृतीमधून दाखवले जाते. कुटुंबीय, नातवाईक, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा हा विधी पार पाडला जातो, तेव्हा त्याचा अर्थ त्या दोघांनी (वधू-वर) एकमेकांना सर्वांच्या साक्षीने स्वीकारले आहे.
फुलांच्या हारांना ‘वरमाला’ का म्हटले जाते?
Mythologist देवदत्त पटनायक यांनी व्हिडीओमध्ये वरमाला शब्दामागील कारण सांगितले आहे. आपल्या देशात पूर्वीच्या काळी ‘स्वयंवर’ ही संकल्पना अस्तित्त्वात होती. स्वयंवरामध्ये वधू ज्या पुरुषाची निवड ‘वर’ म्हणून करत असे, त्याच्या गळ्यात वरमाला घालून त्याचा स्वीकार करत असे. वराची निवड करताना त्याच्या गळ्यात माला (फुलांचा हार) घालणे यावरुन ‘वरमाला’ हा शब्द आला असावा असे म्हटले जाते.
आणखी वाचा – आमंत्रण की, निमंत्रण? अर्थामध्ये नेमका फरक काय?
देवदत्त यांनी त्यांच्या लेखांमध्ये लग्नातील आणखी एका विधीची माहिती दिली आहे. या विधीचे नाव ‘पाणिग्रहण’ असे आहे. यामध्ये वर त्याच्या नववधूचा स्वीकार करतो. त्याच सुमारास वधूचा पिता किंवा घरातील वडीलधारी व्यक्ती वधूला वराकडे सुपूर्त करतात, या विधीला कन्यादान असे म्हटले जाते. या दोन्ही विधींना हिंदू लग्नात अनन्यसाधारण महत्त्व आहे.