करोनाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. विविध १०० हून अधिक देशांमध्ये ४,००० बळी घेणाऱ्या करोना विषाणूजन्य आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) महासाथ म्हणून घोषित केल्याचे गंभीर पडसाद गुरुवारी भांडवली बाजारातही उमटले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी निफ्टी ९५० अंकांनी पडला तर सेन्सेक्स ३१०० पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये लोअर सर्किट लागले आहे. शेअर बाजार उघडात मोठी पडझड झाल्याने शेअर बाजारात एका तासासाठी लोअर सर्कीट लावण्यात आलं आहे.

लोअर सर्किट म्हणजे काय?

ठराविक दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली किंवा बाजारीने उसळी घेतल्यास लोअर किंवा अप्पर सर्किट लावले जाते. शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्यास लोअर सर्कीट लावले जाते. कमी कालावधीमध्ये सर्वच शेअर्सचे भाव गडगडल्यास लोअर सर्किट लावले जाते. लोअर सर्किट म्हणजे एका ठराविक किंमतीपेक्षा कमी दराला शेअर्स विकण्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये आणखीन पडझड होत नाही.

नक्की वाचा>> शेअर बाजाराचा ‘ब्लॅक फ्रायडे’; निर्देशांक ३० हजारांच्या खाली

अपर सर्किट म्हणजे काय?

या उलट दुसरीकडे शेअर बाजाराने अनपेक्षितपणे उसळी घेतल्यास अपर सर्किट लावले जाते. अशावेळेस प्रत्येक शेअरचा दर एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वाढवता येत नाही. शेअर बाजारामध्ये समतोल कायम रहावा म्हणून हे सर्किट लावले जातात.