Micromancing चा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे. चित्रपटात दाखवलं जातं त्या कृत्रीम हावभावांचं अनुकरण लोक प्रेमातही करत असत. मात्र त्या पलिकडे जाऊन आता लोक ‘मायक्रोमॅन्सिंग’ ( Micromancing ) करत आहेत. मायक्रोमॅन्सिंग ( Micromancing ) म्हणजे काय आपण जाणून घेऊ.

Micromancing म्हणजे काय?

प्रेम व्यक्त करणारे हावभाव चेहऱ्यावर आणणं, कृतीतून व्यक्त करणं यापेक्षा विचारपूर्वक भावनांमधून आपलं प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेंड म्हणजे Micromancing. दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमधून विचारपूर्वक कृती करुन प्रेम करायचं आणि आपलं नातं आणखी घट्ट करायचं याची आता अनेक जोडप्यांना गरज भासू लागली आहे. एकमेकांना स्मायली पाठवणं, मीम्स पाठवणं, एकमेकांसाठी आवडीच्या गोष्टी घेऊन जाणं, फुलं नेणं यांसारख्या गोष्टींचा समावेश मायक्रोमॅन्सिंगमध्ये होतो.

मानसोपचार तज्ज्ञ अंबरीश घोष काय या ट्रेंडबाबत काय म्हणाले?

Micromancing या नव्या ट्रेंडबाबत सीएमआरआयचे सल्लागार आणि मानतसोपचार तज्ज्ञ डॉ. अंबरीश घोष म्हणतात, “लोक आजकाल खूपच व्यग्र आहेत. एक काळ असा होता की जोडीदाराचा वाढदिवस आला की त्याला सरप्राईज देणं त्यांना आवश्यक वाटे. आता एक दिवसाआड किंवा दररोज आपल्या जोडीदाराला भावनिकदृष्ट्या तुझ्यावर माझं प्रेम आहे असं सांगितलं जातं. जोडीदार आपल्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टींचीही काळजी घेतो. यातून दोघांनाही आनंद मिळतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची कृती योग्यच आहे.” असं डॉक्टर घोष यांनी सांगितलं.

मायक्रोमॅन्सिंग म्हणजे बारीकसारीक गोष्टींमध्येही एकमेकांची काळजी घेणं

Micromancing म्हणजे तुमच्या प्रेमाच्या अविस्मरणीय आठवणी पुसून टाकणं असा नाही. ते क्षण आठवणीत राहणार आहेतच. पण आपल्या जोडीदाराची अगदी बारीकसारीक गोष्टींमध्ये काळजी घेणं. त्याचं/तिचं म्हणणं ऐकणं, त्याला/तिला महत्त्व देणं या सगळ्या बाबी नातं अधिकाधिक दृढ करण्यासाठी आवश्यक ठरतात. एखादी प्रेमळ चिठ्ठी लिहून ठेवणं, एकत्र वॉकला जाणं, रोज कॉफी एकत्र पिणं इथपासून अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. डॉ. घोष पुढे म्हणाले आजकाल गप्पा मारत असताना दोन जोडीदार त्यांच्या सुखद आठवणींना उजळा देतात. तसंच एखाद्या प्रसंगाचं वर्णन त्यामध्ये मी कसा वागलो? तू कशी वागली? हे आठवून हसतात. या गोष्टी केल्याने त्यांना समाधान मिळतं. डॉक्टर घोष म्हणतात अनेक जोडपी दीर्घकाळ मायक्रोमॅन्सिंग टिकवू शकतात.एकमेकांच्या व्यावसायिक आयुष्यावर परिणाम न करता आपल्या जुन्या आठवणींना उजळा देण्याचा हा ट्रेंड आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवणं हे या सगळ्यात महत्त्वाचं ठरतं.