Microsoft CrowdStrike Global Outage: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या सर्व्हरमधील बिघाडानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांतील हवाई सेवांवर त्याचा परिणाम झाला आहे. केवळ एअरलाइन्सच नाही तर अनेक देशांच्या बँकिंग यंत्रणा आणि शेअर बाजारांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये ही समस्या ‘क्राउड स्ट्राइक’मुळे आली असल्याचे सांगण्यात येत आहे. जगभरात खळबळ उडवून देणारा हा ‘क्राउड स्ट्राइक’ नेमकं काय आहे? याविषयी तुम्हाला माहिती आहे का, चला तर सविस्तर जाणून घेऊया…
मायक्रोसॉफ्टमध्ये गडबड, सेवा बंद
क्राउड स्ट्राईकमधील एररमुळे मायक्रोसॉफ्ट विंडोज कॉम्प्युटर वापरत असलेल्या जगभरातील युझर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे संपूर्ण जगातील कामकाज ठप्प झाले असून याचा परिणाम उड्डाणे, विमानतळ, बँका आणि शेअर बाजारासह सर्व क्षेत्रांवर झाल्याचे दिसून आले आहे. भारतातील एअरलाइन्समध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि आकासा एअरचा समावेश असून या फ्लाईट्सचाय बुकिंग आणि चेक इन सेवांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे आढळून आले आहे.
क्राउड स्ट्राइकच्या अपडेटनंतर जगभरातील सिस्टीममधील ही अडचण सुरू झाली. या अपडेटनंतर, Microsoft Windows सपोर्ट असलेली बहुतांश उपकरणे चालू असताना क्रॅश होत आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या लॅपटॉपवर अचानक निळा स्क्रीन दिसत आहे आणि लॅपटॉप रिकव्हरी मोडमध्ये जात आहे.
(हे ही वाचा : कोणत्या ठिकाणी वीज पडण्याचा धोका सर्वाधिक? तुमच्या शहराचा आहे का समावेश, जाणून घ्या…)
CrowdStrike नेमकं काय आहे?
CrowdStrike ही सायबर सुरक्षा कंपनी आहे. हे जगभरातील बहुतेक संगणक आणि लॅपटॉपसाठी प्रगत सायबर सुरक्षा उपाय प्रदान करते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जे सर्व प्रकारचे सायबर हल्ले रोखते. क्राउड स्ट्राइक ही कंपनी विंडोज कॉम्प्युटर्ससाठी ॲडव्हान्स्ड सायबर संरक्षण उपाय प्रदान करते आणि फाल्कन हे क्राउड स्ट्राइकचं मुख्य प्रॉडक्ट आहे. फाल्कनमधील टेक्निकल एररमुळे हे आउटेज निर्माण झालं आहे. कंपनीचे फाल्कन उत्पादन नेटवर्कवर दुर्भावनापूर्ण किंवा व्हायरसयुक्त फायली शोधते. हे दुर्भावनापूर्ण फाइल्स शोधण्यासाठी आणि व्हायरस थांबवण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरते. फाल्कन सिस्टीम ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन असो, एंडपॉइंट सुरक्षा करू शकते.
ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) म्हणजे काय?
ब्लू स्क्रीन ऑफ डेथला ब्लॅक स्क्रीन एरर असंही म्हणतात. हार्डवेअर फेलियर ते सॉफ्टवेअर समस्येमुळे ब्लू स्क्रीन ऑफ डेथचा सामना केला जाऊ शकतो. ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर दिसणारी कोरी निळी स्क्रीन आहे. जेव्हा सिस्टम काही मोठ्या समस्येमुळे क्रॅश होते, जे त्यास सुरक्षितपणे कार्य करण्यापासून प्रतिबंधित करते तेव्हा असे होते. जेव्हा ही समस्या उद्भवते, तेव्हा संगणक अनपेक्षितपणे रीस्टार्ट होऊ शकतो आणि परिणामी जतन न केलेला डेटा गमावला जाऊ शकतो.
उपाय काय आहेत?
जर तुमचा लॅपटॉपदेखील बीएसओडी समस्येचा बळी ठरला असेल तर घाबरण्याची गरज नाही, मायक्रोसॉफ्ट आणि क्राउड स्ट्राइक सध्या या समस्येवर काम करत आहेत. ते लवकरच याबाबत तांत्रिक इशारा जारी करू शकतात. परंतु, जोपर्यंत तांत्रिक सूचना जारी होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या लॅपटॉपशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू नये. सध्या कंपन्या या समस्येच्या निराकरणावर काम करत आहेत आणि लवकरच यासंबंधी अपडेट जारी केले जाऊ शकते.