How To Identify Spoiled Milk: भैय्या दूध ताजा है ना? नुसतं विचारून जर आपल्याला योग्य उत्तरे मिळाली असतील तर बहुतांश समस्या सुटल्या असत्या पण असं होत नाही. जरी तुमच्या तोंडावर तुम्हाला दूध विक्रेत्याने दुजोरा दिला तरी अनेकदा आदल्या दिवशी किंवा अगदी फार पूर्वीच दूध विकलं जाण्याचा धोका असतो. यात पंचाईत अशी की ग्राहकांना याची कल्पनाही येणार नाही अशा चलाखीने हे दूध विकले जाते. म्हणूनच दुधाच्या पिशव्यांवर एक्सपायरी डेट म्हणजेच वैधता संपण्याची तारीख नमूद करणे अनिवार्य आहे, पण तुम्हाला माहित आहे का की हे एक्सपायरी डेट दिसावी यामागे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अल कॅपोनचे योगदान आहे.
तुम्ही शिकागो माफिया अल कॅपोनचे नाव ऐकले असेलच, अनेकांना यमसदनी धाडणारा कॅपोन याने डेयर्डे मेरी कॅपोन हिच्यासाठी लढा देताना दुधाच्या बाटल्या व पॅकेटवर वैधता संपण्याची तारीख असावी यासाठी मोठे प्रयत्न केले होते. Cookist या वेबसाईटच्या माहितीनुसार १९२० ते १९३० या काळात अल कॅपोन फक्त अवैध पद्धतीने दारू विक्री करून १०० मिलियन कमवत होता मात्र एका वेळी त्याला या नेहमीच धोक्यात असलेल्या जीवनशैलीचा कंटाळा आला होता परिणामी त्यांने दूध व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
प्रत्येक जण दररोज दूध सेवन करतो, विशेषत: लहान मुले असलेली कुटुंब दुधासाठी मोठे ग्राहक असतात. दुधाचे व्यवसायक्षेत्र दारुपेक्षा जास्त असते. सर्वांत उत्तम म्हणजे, शिकागो आउटफिटने तेव्हा बेकायदेशीर दारू विक्री रोखण्यासाठी बाटल्या सील करण्याची पद्धत सुरु केली होती. या बॉटल दुधासाठी वापरल्या जाऊ शकतात असा अल कॅपोनने विचार केला. दुधाच्या उत्पादनावरील नियमांच्या अभावामुळे कॅपोनला बाजारपेठेवर कब्जा करण्याची संधी मिळाली.
डेयर्डे कॅपोनने या कथेची पुष्टी केली नसली तरी, काही अहवाल सांगतात की अल कॅपोन दुधाच्या व्यवसायात आला त्याआधी त्याची पुतणी डेयर्डे हि खराब झालेले दूध प्यायल्याने खूप आजारी पडली होती यानंतर गर्भवती महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी कॅपोनने दुधाच्या बाटलीवर ‘Best By’ ही तारीख टाकण्यास सुरुवात केली व असा नियमच करून घेतला.
दरम्यान पुढे, नैराश्याच्या काळात, कॅपोनने शिकागो मध्ये पहिले सूप किचन सुरु केले होते, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबियांना दररोज तीन वेळचे जेवण देण्याचे काम हा एकेकाळचा रॉबिन हूड करत होता.