– सुनीता साने
मोबाइल नंबर खरेदी करताना, स्वत:ची जन्मतारीख बघून त्या अंकाची बेरीज किंवा आपल्या आवडत्या अंकाचा किंवा शुभ अंकाचा घेण्याची सवय आहे. काहींना व्हीआयपी नंबर घेण्याची आवड असते. जेणे करून तो नंबर सहजरीत्या सर्वाच्या लक्षात राहू शकतो. जो नंबर आपण घेतो, त्यातले पहिले पाच अंक, हे त्या कंपनीचेच असतात आणि पुढचे पाच नंबर आपल्याला हवे तसे मिळू शकतात. सध्या मोबाइल पोर्टेबिलिटीमुळे कोणत्या कंपनीचा हा नंबर आहे हे सांगणे जरा अवघडच जाते. मोबाइल हा आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे आपण वापरत असलेला मोबाइल क्रमांकही आपल्या भाग्याशी निगडित असतो असं मानलं जातं. त्यासंदर्भात न्यूमरॉलॉजी म्हणजेच अंकशास्त्र काही ठोकताळे मांडतं.
नाव, जन्मतारीख आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जसे सांगतात, त्याच पद्धतीत मोबाइल नंबरदेखील खूप गोष्टी सांगून जातो. पारंपरिक कुंडलीप्रमाणेच अंक कुंडलीही मांडली जाते. पारंपरिक कुंडलीमधे १२ ग्रह, १२ राशी असतात. इथे ९ ग्रह, ९ घर असतात. ती कुंडली पुढीलप्रमाणे असते.
अंक कुंडली :
अंक आणि त्यांचे ग्रह बघू या : १ = रवी, २ = चंद्र, ३ = गुरू, ४ = हर्षल/राहू, ५ = बुध, ६ = शुक्र, ७ = नेपच्यून/केतू, ८ = शनी, ९ = मंगळ
या अंक कुंडलीत आपली जन्मतारीख किंवा मोबाइल नंबर कसा लिहायचा ते पाहूयात.
उदा. ६ फेब्रुवारी १९७५ अशी तारीख असल्यास
इथे ७५ ची बेरीज ७ + ५ – १२ = ३ घेतलीय. तसेच संपूर्ण जन्मतारखेची बेरीज ३० येते. (६ + २ + १ + ९ + ७ + ५ = ३० = ३) म्हणून अजून एक वेळेला ३ हा अंक घेतोय.
मोबाइल नंबरची कुंडली कशी मांडायची ते बघू. उदा. ९८९०७९५५४५ हा नंबर असल्यास अशा पद्धतीने ती कुंडली मांडली जाते. मात्र मोबाइल नंबरची कुंडली मांडताना त्याची बेरीज घेऊ नये. (शून्य असल्यास, शून्याच्या आधीचाच नंबर परत घ्यावा.)
इथे ७, ५ (नेप्यच्यून, बुध), ८, ४ (शनी, हर्षल), ९, ५ (मंगळ, बुध), ५, ४ (बुध, हर्षल) अशा अंकांची युती आहे. त्यात डाव्या भागात जास्त ग्रह आहेत. या जातकाला दुसरा नंबर घेण्यास सांगितला, ज्यायोगे करिअरमध्ये तो अजून पुढे जाऊ शकेल. कुंडली मांडल्यानंतर कुंडलीतील योग आपण बघू शकतो. कोणत्या ग्रहांची युती आहे, कोणत्या ग्रहांचा विरोध आहे, ते पाहता येते. चतुर्थ दृष्टी, त्रिकोण असे बरेच प्रकार आहेत. त्यातूनच आपली कुंडली कशी आहे, याचा सारासार विचार करता येतो.
मोबाइल नंबर हा लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करतो. त्याच्यामधील व्हायब्रेशन किंवा तरंग शक्तीमुळे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात. ही तरंग शक्तीच आपल्याला घरबसल्या काही संदेश देते. अख्खे जग या छोटय़ाशा मोबाइलमध्ये सामावले गेले आहे. मात्र या आभासी जगात वावरताना, आपल्या जवळच्या लोकांपासून आपण दूर जातो आहोत. हल्ली माणसे समोर आली की एकमेकांशी बोलू शकत नाहीत. मात्र फोनवरून मेसेजेसच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सुरुवात करतात. मोबाइलमुळे खिशातच मिनी संगणक असतो, ज्यायोगे आपला व्यवसाय कुठेही, कधीही करता येऊ शकतो.
काही मोबाइल नंबर्सची वैशिष्टय़े बघूयात.
मोबाइलमधे ३, १, ९ असे अंक असल्यास उच्च शिक्षण होते. ती व्यक्ती साहसी असते. नोकरी/व्यवसायात टॉपला जाते.
२, ८, ४ असे अंक असल्यास घरापासून/जन्मठिकाणापासून लांब राहिल्यास फायदा होतो. पाणी आणि अग्नीपासून जपावे.
१, ७, ८ अंक असल्यास ती व्यक्ती सर्वाना मदतीचा हात पुढे करते. पण तिला मदत करायला कुणी पुढे पटकन येत नाही. ती एकापेक्षा जास्त मार्गाने पसे कमावू शकते.
३, ६, २ अंक असल्यास विवाहानंतर भाग्योदय असतो, प्रवासाचे योग येतात.
३, १, ७ अंक असल्यास संघर्षयुक्त जीवन, घरात कुरबुरी असतात.
अशा अंकाशी सांगड घालून खूप गोष्टी लक्षात येतात. तुमच्या मोबाइलमधे जर पुढीलप्रमाणे काही अंक जोडीने येत असतील तर त्याचा प्रभावही कसा होतो ते बघूयात.
२८ किंवा ८२ – पाण्यापासून सावध राहावे. पाण्याशी खेळ करू नये. जिवावर बेतू शकते. शिक्षणात अडथळे येतात. वृत्ती अहंकारी असते.
२४ किंवा ४२ – नकारात्मक विचार आधी येतात. खूप लवकर निराशा घेरते.
१४ किंवा ४१ : शारीरिक कष्ट खूप करावे लागतात. कर्ज वरचेवर घ्यावे लागते. कर्ज लवकर फिटत नाही.
९७ किंवा ७९ : वडिलांपासून लांब राहिल्यावर प्रगती साधू शकतात.
७५ : बोलण्यातून, लिखाणातून नावलौकिक.
अशा प्रकारच्या विविध अंकांच्या युतीमुळे जीवनात खूप काही घडामोडी घडताना आढळतात.
आपल्या जन्मतारखेत किंवा मोबाइलमध्ये जे अंक आपल्याकडे नसतात, त्याबद्दल थोडक्यात बघूयात. त्याला ‘मिसिंग नंबर्स’ म्हणतात.
- दुसऱ्यांच्या सल्ल्याने वागावे लागते.
- आत्मविश्वास कमी.
- खूप मेहनत करून पुढे येतात.
- स्वत:च्याच विचारांमध्ये गुरफटलेले असतात.
- बोलण्यात अडचणी/भावना नीट व्यक्त करता येत नाहीत.
- नावलौकिक कमी, सुखाची कमतरता, सतत चिंता, कटकटी.
- कामात अडचणी, शिक्षणात अडथळे, पुढे जाऊ शकत नाही.
- निर्णय घेऊ शकत नाहीत. भौतिक साधनांचा अभाव.
- संघर्षयुक्त जीवन, आत्मविश्वास, शौर्य कमी पडते.
आपण करत असलेला व्यवसाय आणि आपला मोबाइल नंबर यांची सांगड योग्य असेल, तर यशाचे शिखर गाठताना फार कसरत करावी लागणार नाही. व्यवसायाच्या बरोबरच शिक्षणाचाही विचार करणे गरजेचे ठरते. शिक्षणाची कोणती शाखा आपण निवडलीय, त्यानुसार अंकांची योग्य ती जुळणी असेल, तर अधिकस्य अधिकम् फलम् असेच म्हणावे लागेल. जुळ्या मुलांमध्ये जन्मतारीख एकच असते, पण आíथक जीवन, अभ्यास याबाबत खूप तफावत आढळते. त्यांच्या मोबाइलचा, शाळेतील रोल नंबरचा विचार केल्यावर अडचण कुठे येतेय हे बघून, मोबाइल नंबर काही विशिष्ट अंकावर घेण्यास सुचवल्यास फायदा होतो. जी व्यक्ती तो मोबाइल नंबर वापरते, तिलाच फायदा होतो. मग तो कोणाच्याही नावावर असला तरी चालतो. त्यामुळे मुलांना मोबाइल नंबर घेऊन देताना, पालकांनी योग्य ती खबरदारी घेतली, तरी खूप उत्तम होईल. प्रत्येक अंकातून जी स्पंदने बाहेर पडतात, त्याचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो. ही स्पंदने जशी जन्मतारखेशी, नावाशी मिळतीजुळती असतात, तशीच ती मोबाइल नंबरशीदेखील जुळायला हवीत. इतकेच काय, तुमचे बँक अकाऊंट नंबरसुद्धा योग्य त्या अंकांच्या युतीत बनले असेल तर धनवृद्धी चांगल्या मार्गाने होऊन चिरंतन टिकून राहते.
आपला जुना मोबाइल नंबर सर्व ठिकाणी रजिस्टर झाला असेला तर नवीन नंबरचा फायदा कसा घ्यायचा असा प्रश्न सर्व जातकांना आणि वाचकांना पडतो. हा नवीन नंबर तुम्ही शक्य असेल, तेवढा वापरायला सुरुवात करा आणि फरक अनुभवा. खूप जातकांनी त्याचा फायदा उठवलाय. सतत आजारपण, यशाची हुलकावणी, कर्जफेड न होणे, अभ्यासात व्यत्यय, कटकटी, घर घेताना अडचणी, कर्तृत्व असूनही दखल घेतली न जाणे, राजकारणात पद न मिळणे, प्रमोशन्स अडणे, परदेश प्रवासात वारंवार अडथळे अशांसारख्या अनेक गोष्टींसाठी आपला मोबाइल नंबर सुयोग्य आहे का नाही याची खात्री करून घ्या आणि या मोबाइलच्या क्रांतिकारी युगात स्वत:ला एक पाऊल पुढे ठेवाच. मग, तुमचा मोबाइल नंबर काय सांगतोय…
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com