मोदी सरकारने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजनेची (APY) सुरूवात केली होती. प्रामुख्याने असंघटीत क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचा विचार करुन ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये किमान रक्कम गुंतवून आपण चांगला परतावा मिळवू शकतात. १८ ते ४० वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि वयाची साठी ओलांडल्यानंतर प्रतिमहिना एक हजार ते ५ हजार रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. पेन्शनची मर्यादा ५ हजाराहून १० हजार करण्यावर सरकारकडून विचार सुरू आहे.
प्रतिमहिना, त्रैमासिक आणि सहामासिक असे तीन प्रकारांत तुम्ही गुंतवणूक करू शकता. अटल पेन्शन योजनेद्वारे (APY) किमान किती गुंतवणूक केल्यावर किती जास्त फायदा होईल, हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (NSDL) च्या एका अहवालानुसार, जर तुमचं वय १८ वर्ष आहे आणि तुम्ही महिन्याला केवळ ८४ रुपयांची गुंतवणूक करत असाल तर वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहिन्याला २ हजार रुपये पेन्शन मिळेल. म्हणजेच १००८ रुपयांमध्ये तुम्हाला वर्षाला २४ हजार रुपये पेन्शन मिळेल, आणि जर पेन्शनची सीमा वाढली तर परतावाही वाढेल.
काय करावं –
बॅंकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये केवळ एक बचत खातं उघडण्याची गरज आहे, जर पहिल्यापासूनच खातं असेल तर केवळ या योजनेसाठी तुम्ही अर्ज दाखल करा आणि गुंतवणुकीला सुरूवात करु शकतात. तुम्ही प्रति महिना, तीन महिने किंवा सहा महिन्यांमध्ये पेमेंट करु शकतात.
ऑनलाइन कसा करायचा अर्ज –
अटल पेन्शन योजनेचा फॉर्म सर्व बँकांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. हा फॉर्म डाउनलोड करुन संपूर्ण माहिती भरावी त्यानंतर हा फॉर्म बॅकेत पुन्हा जमा करावा. यासोबत काही कागदपत्रंही तुम्हाला जमा करावी लागतील.
काय आहे पात्रता –
देशाचा कोणताही नागरीक ज्याचं वय १८ ते ४० वर्षांमध्ये आहे तो कोणताही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकतो.