Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’ची राज्यभरात चर्चा सुरु आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. ३१ जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिकसहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. आज शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आज १७ ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना मिळणार आहे.

(हे ही वाचा : Ladki Bahin Yojana Apply Online : लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आणली वेबसाईट, जाणून घ्या अर्ज भरण्याची सर्वांत सोपी प्रक्रिया! )

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार, अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र वा जन्म दाखला प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्या महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर त्याऐवजी अर्जदाराचे १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावं, याशिवाय त्या घरातील कोणीही सरकारी नोकरीतील कर्मचारी नसावे अथवा इनकम टॅक्स भरणारे नसावे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकते.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्या महिलांनी अशावेळी काय करावं, कुठे तक्रार करावी, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर काळजी करु नका, तुम्ही यासंबंधी कुठे तक्रार करु शकता, जाणून घ्या…

योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाही? ‘येथे’ करा तक्रार

माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. यासाठी १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. यासोबतच महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवू शकतात. तसेच महिलांना याबाबत अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदविता येईल. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money of ladki bahin yojana has not yet been credited to account read to know more pdb