अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग १९६९ साली चंद्रावर आपलं पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले होते, “माणसाचं हे लहानसं पाऊल परंतु मानवजातीची मोठी झेप आहे.” संपूर्ण जगासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरलेल्या या दिवसाला आज तब्बल ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. २० जुलै हा दिवस जगाच्या इतिहासातील एक अत्यंत खास दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी मानवाने चंद्रांवर आपलं पहिलं पाऊल ठेवलं होतं. ५२ वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेच्या अपोलो ११ या अंतराळ यानाने अवकाशात चंद्राच्या दिशेने झेप घेतली तेव्हा संपूर्ण जगभरातील लोक चंद्राच्या पृष्ठभागावरील मानवाच्या त्या पहिल्यावहिल्या स्वारीचं वर्णन ऐकण्यासाठी रेडिओला कान लावून बसले होते.
चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या अमेरिकेच्या अपोलो ११ या अंतराळयानामध्ये कमांडर नील आर्मस्ट्रॉंग यांच्यासह ल्यूनार मोड्यूल पायलट्स बझ अल्ड्रीन आणि मायकेल कॉलिन्स होते. यावेळी, बझ अल्ड्रीन आणि नील आर्मस्ट्रॉंग या दोघांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पहिली क्रू लँडिंग केली. तर कॉलिन्स यांनी अपोलो ११ कमांड मॉड्यूल कोलंबियाचं चंद्राभोवती उड्डाण केलं होतं.
अंतराळ यानातून चंद्रावर उतरल्यानंतर तब्बल ६ तासांनी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं. यावेळी अंतराळ यानाबाहेर अर्थात चंद्राच्या पृष्ठभागावर आर्मस्ट्रॉंग यांनी सुमारे अडीच तास घालवले. पुढे आर्मस्ट्रॉंग यांच्यानंतर अल्ड्रिनही चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यावेळी या दोन्ही अंतराळवीरांनी पुढील अभ्यास आणि विश्लेषणासाठी चंद्रावरची तब्बल २१.५ किलो सामग्री गोळा केली आणि पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला.
नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील एका साइटवर २१ तासांपेक्षा जास्त वेळ घालविला. ज्या साईटला त्यांनी ‘Tranquility Base’ असं नाव दिलं. चंद्राच्या पृष्ठभागावर इतका वेळ घालवल्यानंतर पुन्हा कॉलिन्ससोबत अपोलो ११ कमांड मॉड्यूल कोलंबियामधून २४ जुलै रोजी हे तिघेही अंतराळवीर पृथ्वीवर दाखल झाले.
मानवाच्या चंद्रावरील या पहिल्या ऐतिहासिक आणि यशस्वी मोहिमेच्या सन्मानार्थ १९७१ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राष्ट्रीय चंद्र दिनाची घोषणा केली होती.
मोहिमेचं महत्त्व :
* या मोहिमेचं थेट प्रसारण त्यावेळी जगभरातील लाखो लोकांनी पाहिलं. या मिशनच्या यशानंतर नासाने लँडिंगचं वर्णन “आतापर्यंतची एकमेव मोठी तांत्रिक उपलब्धी” म्हणून केलं आहे.
* २० जुलै हा दिवस फक्त अमेरिकेच्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक ठरला. कारण या मिशनच्या यशानंतर संपूर्ण जगासाठी नवीन शोध आणि शक्यतांचं आभाळ खुलं झालं.
* अपोलो ११ च्या यशानंतर नासाने जगातील आणखी काही मोहिमांसाठी आपले प्रयत्न वाढवले.
एखाद्या तारांगणाला भेट देऊन तुम्ही आजचा हा चंद्र दिवस साजरा करू शकता. मात्र, करोनासंबंधी नियमांमुळे तुम्हाला त्यासाठीची परवानगी मिळू शकणार नसेल तर तुम्ही निश्चितच अपोलो ११ मिशनबद्दल, तयारी, चाचण्या आणि अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाबाबत माहिती मिळवू शकतात.