Most Expensive Ice cream In World: भारतामध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याला सुरुवात होते. पुढे एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत उन्हाचे प्रमाण वाढत जाते. उन्हाच्या झळांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. या काळात आईसक्रीमला मोठी मागणी असते.उन्हाळ्याच्या गरम वातावरणात आईसक्रीम खाण्याची मजा काही और असते. सध्या बाजारामध्ये १० रुपयांपासून ५००, १००० रुपयांपर्यंत आईसक्रीम उपलब्ध आहे. श्रीमंत लोक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन महागडी आईसक्रीम खात असतात. पण जगामध्ये अशीही एक आईसक्रीम आहे, जी खाण्याआधी कोणतीही श्रीमंत व्यक्ती दहा वेळा नक्की विचार करेल.
जपानमध्ये मिळते जगातील सर्वात महाग Ice-cream
ऑडिटी सेंट्रल न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०२३ रोजी ‘सिलाटो’ कंपनीने ‘ब्याकुया’ (Byakuya) ही जगातील सर्वात महाग आईसक्रीम बनवून विश्वविक्रम रचला आहे. या आईसक्रीमचा बेस बनवण्यासाठी दूधाचा वापर करण्यात आला आहे. दूधाव्यतिरिक्त दोन वेगवेगळ्या प्रकारचे चीज, व्हाइट ट्रूफल ऑईल आणि अंडी यांचा समावेश ब्याकुया बनवताना केला आहे. यात प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे. एका स्टायशिल ब्लॅक बॉक्समध्ये या आईसक्रीमची पॅकिंग केली जाते. या खास बॉक्ससह एक विशिष्ट चमचा देखील दिला जातो. जपानमधील क्योटो शहरातील मंदिर बनवण्यासाठी ज्या तंत्राचा वापर कामगार करत असतात, त्या तंत्राद्वारे ब्याकुयाच्या बॉक्ससह दिल्या जाणाऱ्या चमच्याची निर्मिती केली जाते.
आणखी वाचा – अबब! ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा, ज्याची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
या Ice-cream ची किंमत किती आहे?
सिलाटो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 130ml ब्याकुया आईसक्रीमची किंमत ६,७०० अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनाचा विचार केल्यास ही रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त होते. यावरुनच आपण ही आईसक्रीम किती महाग आहे याचा अंदाज लावू शकतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ब्याकुया आईसक्रीमच्या नावांवर ‘Most expensive ice cream in world’ हा विश्वविक्रम आहे. सिलाटो कंपनीने ही आईसक्रीम व्हाइट व्हाइनसह खाण्याचा सल्ला दिला आहे.