‘आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. क्षमाशील वृत्तीने मुलांचा अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी मुलांवर मायेचा पदर पांघरून मुलांना कुशीत घेणारी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, असेच म्हणावे लागेल… हे सगळं आठवतं जेव्हा आईबद्दल काहीतरी लिहायचं असतं तेव्हा. इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. पण, आईबद्दल भरभरुन बोलले जाते ते म्हणजे ज्या दिवशी असतो मातृदिन. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हा दिवस जगभरात साजरा केला जाईल. असा हा मातृदिन अर्थातच Mother’s Day साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली? जाणून घेऊयात मदर्स डे इतिहास आणि बरंच काही…आईला सन्मान देण्यासाठी जगभरात मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा १० मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे.
कशी झाली मदर्स डेची सुरुवात ?
आईला सन्मान देणारया मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुले जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.
मेच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मदर्स डे ?
९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये लिहिले होते की, मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्ड डे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.