Mumbai Cricket History : भारतीय क्रिकेट संघाविषयी जेव्हा कधी बोलले जाते तेव्हा मुंबईचे नाव चर्चेत आल्याशिवाय राहत नाही. कारण- भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचे स्थान खूप मोलाचे आहे. मुंबईने भारतीय क्रिकेट संघाला आजवर खूप काही दिले. त्यामधील सुनील गावसकर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असे अनेक दिग्गज खेळाडू मुंबईचे आहेत. इतकेच नाही, तर भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ ट्रॉफी ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली जिंकली तो कर्णधार रोहित शर्मादेखील मुंबईचा आहे. इतकेच नाही, तर सूर्यकुमार यादव, शिवम दुबे हे खेळाडूदेखील मुंबईतच घडले. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ मुंबईशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.
मुंबई आणि क्रिकेटचं फार जुनं नातं आहे. आजही क्रिकेट म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा शिवाजी पार्क उभं राहतं. पण, त्याआधी दक्षिण मुंबई हा भागच क्रिकेटचा केंद्रबिंदू होता. असं सांगितल जातं की, भारतात बरोबर ३०० वर्षांपूर्वी गुजरातमधील खांबट येथे पहिल्यांदा क्रिकेट खेळले गेल्याची नोंद आहे. मद्रास, कोलकाता व मुंबई ही इंग्रजांची मुख्य व्यापार केंद्रं असल्यानं इथे क्रिकेट खेळलं जायचं. पण, मुंबईत क्रिकेटचं बीज कुठे आणि कसं रोवल गेलं ते समजून घेऊ…
इंग्रजांनी शत्रूंपासून वाचण्यासाठी तयार केलेलं मोकळ मैदान झालं पुढे क्रिकेट ग्राउंड (Mumbai Cricket History)
अठराव्या शतकात मुंबईच्या किल्ल्याच्या म्हणजे फोर्टभोवती इंग्रजांनी एक मोकळा भूखंड ठेवला होता; ज्याचं नाव होतं ‘एस्प्लनेड’. या भूखंडावर घरं बांधण्यास त्या काळी परवानगी नव्हतीच; पण तेथील सर्व झाडंही कापून टाकली गेली होती. पण त्यांनी असं का केलं, असा प्रश्न उपस्थित होतो. यामागचं कारण म्हणजे वसईच्या मोहिमेनंतर मराठे पोर्तुगीजांसारखेच आपल्यालाही भारतातून हुसकावून लावतील या भीतीखाली इंग्रज जगत होते. फक्त मराठेच नव्हे, तर डच, सिंधी, पोर्तुगीज, अरब व फ्रेंच यांच्या हल्ल्याचीदेखील भीती त्यांना होती. ‘एस्प्लनेड’ निर्माण करण्याचा उद्देश असा होता की, जर मैदान मोकळं असेल, तर शत्रूला कुठेही लपता येणार नाही, तसेच फोर्टच्या तटबंदीवरून तोफा, बंदुकीने सहज हल्ला करता येईल.
पण, कालांतरानं हे मैदान करमणुकीकरिता वापरलं जाऊ लागलं. या मैदानाच्या दक्षिण टोकाला एक बॅण्डस्टॅण्ड बांधले होते; जे आजही कूपरेज मैदानात शाबूत आहे. इथे इंग्रज कुटुंबं संध्याकाळी जमून सैनिकी बॅण्डचे संगीत ऐकायचे. पण, त्या ठिकाणी भारतीयांना प्रवेश नव्हता. यावेळी भारतीय मैदानाच्या पश्चिम भागातील तटावर फेरफटका मारत बसायचे. म्हणून त्या भागाला हवाखाना, असे म्हटले जायचे.
इंग्रजांनी सुरु केलेल्या क्रिकेट खेळाने भारतीयांना लावले वेड
आता मैदान म्हटलं तर खेळ आलेच. मैदानाच्या उत्तर टोकाला धोबीतलावजवळ इंग्रजांच्या सैन्याची मरीन लाइन्स नावाची छावणी होती, तिथले सैनिक व्यायामासाठी या मैदानाचा वापर करायचे. घोडे, पोलोसारखे खेळही तेथे खेळले जायचे. पण, इंग्रजांनी एक खेळ इथे सुरू केला आणि त्यानं समस्त भारताला वेड लावलं. तो खेळ म्हणजे क्रिकेट.
मुंबईतील पहिल्या स्पोर्ट्स शॉपची सुरुवात कधी आणि कोणी केली?
क्रिकेट खेळण्यासाठी इंग्रजांना बॅट व बॉलची गरज होती आणि ते त्यांना खास इंग्लंडहून मागवावे लागायचे; जे काम त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होते. या काळात धोबीतलावाजवळ वागळे नावाचं एक कुटुंब राहायचं. याच कुटुंबानं इंग्रजांना १८६५ मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी लागणारं सामान पुरविण्यास सुरुवात केली आणि मुंबईतील पहिल्या स्पोर्ट्स शॉपची अर्थात ‘वागळे स्पोर्ट्स’ शॉपची स्थापना झाली.
तुम्ही ‘लगान’ चित्रपट पाहिला असेल, तर त्यात जे झालं, तसंच काहीसं मुंबईत १८४० च्या दशकात झालं होतं. चित्रपटातील भुवन आणि इंग्रजांमध्ये कुठलीही पैज लागली नव्हती; पण जसा भुवन इंग्रजांना क्रिकेट खेळताना बघून त्यांच्या खेळाचे बारकावे शिकला. तसंच पारशी तरुणांनीही केलं.
भारतीयांचा पहिला क्रिकेट क्लब हा पारशी व्यक्तींनी १८४८ मध्ये सुरू केला; ज्याचं नाव होतं ‘ओरिएंटल क्रिकेट क्लब’. पारशांपाठोपाठ पाठारे प्रभू, शेळवी, गोयकार आणि मुस्लीम तरुणही हा खेळ खेळू लागले. बॉम्बे जिमखान्याचे सदस्य एस्प्लनेडवरती पोलो खेळायचे. त्यांच्या घोडांच्या टाचांमुळे भारतीयांची क्रिकेट खेळपट्टी खराब व्हायची. त्यावेळी या क्रिकेट संघाने इंग्रज सरकारकडे तक्रार केली, तेव्हा लॉर्ड हॅरिस मुंबईचे गव्हर्नर होते. त्यावेळी लॉर्ड हॅरिसला कळून चुकलं होतं की, पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघणार नाही.
मुंबईत खेळासाठी असे सुरु झाले क्लब आणि जिमखाने (How Clubs and Gymkhana started for sports in Mumbai)
लॉर्ड हॅरिस भारतात येण्याआधी इंग्लंडमधल्या मेरलीबोन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष तर होतेच; पण इंग्लंड संघाचे कॅप्टनही होते. त्यांना वाटले की, अशा प्रकारचे क्लब किंवा जिमखाने जर वेगवेगळ्या समाजाला बांधून दिले, तर ही मैदानं पोलो खेळण्याकरिता परत मोकळी होतील. त्या काळात बॅकबेला लागून चर्नी रोड आणि मरीन लाइन्स या स्थानकांच्या मध्ये समुद्रात भराव टाकून नवीन जमीन निर्माण करण्यात आली होती. या जमिनीचे तुकडे करून, ते वेगवेगळ्या समाजांना देण्यात आले होते.
‘या’ मैदानात सचिन तेंडुलकरने दिली आपली टीव्हीवरील पहिली मुलाखत
पहिला भूखंड अर्थातच तेव्हाच्या सर्वांत श्रीमंत समाजाने म्हणजे पारशांनी उचलला होता. त्यानंतर हिंदू, मुस्लीम, कॅथलिक जिमखानेदेखील बांधण्यात आले. येथील हिंदू जिमखान्यात हेड ग्राउंड्समन होते धोंडू सोलकर; ज्यांचे सुपुत्र एकनाथ सोलकर नंतर विख्यात क्रिकेटपटू झाले आणि याच मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली टीव्हीवरील पहिली मुलाखतही दिली होती.
दरम्यान, १८८६ व ८८ मध्ये पहिल्यांदा भारताहून एक संघ इंग्लंडला क्रिकेट खेळण्यासाठी गेला. हा संघ स्वखर्चाने गेला होता. त्यातील सर्व खेळाडू हे पारशी होते. पण, एखाददुसरा सामना सोडला, तर या संघाला पराभवच पत्करावा लागला होता. त्यानंतर १८८९ मध्ये जॉर्ज वर्नल इंग्लंडहून पहिल्यांदा आपला संघ घेऊन भारतात आले होते. यावेळी मुंबईत पारशी समाजाच्या खेळाडूंविरोधात एक सामना आयोजित करण्यात आला होता; ज्याला ‘क्रिकेट चॅम्पियनशिप’ असे नाव देण्यात आले होते. ही मुंबईतील त्या काळची सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा होती. विशेष गोष्ट म्हणजे त्या सामन्यात पारशी खेळाडूंनी इंग्लंडच्या संघाचा पराभव केला होता.
असे सुरु झाले क्रिकेट संघांचे परदेश दौरे
त्यानंतर १८९२ मध्ये लॉर्ड हॉक आपला संघ घेऊन भारतात आले होते. ते मुंबईत येण्याआधी भारतात सहा सामने ते खेळले होते. त्यातील एकाही सामन्यात त्यांचा पराभव झाला नव्हता. पण, पारशांनी इंग्लंडला हरवलं. पारशांच्या या पराक्रमामुळे त्या काळी इंग्रज विरुद्ध पारशी, असे सामने होऊ लागले होते. पारशांनी इंग्रजांना हरवल्यानंतर त्यांच्यात वार्षिक सामने होऊ लागले; ज्यांना ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी मॅचेस’ असे नाव देण्यात आले होते.
१८७७ पासून इंग्रज आणि पारशी आपापसांत क्रिकेट खेळू लागले. या सामन्यांना प्रथम श्रेणीचा दर्जा दिला गेला. १९०७ मध्ये हिंदू या स्पर्धेत भाग घेऊ लागल्यापासून या स्पर्धेचे नाव ‘बॉम्बे ड्रँग्युलर टुर्नामेंट’ असे झाले; तर मुस्लिमांच्या सहभागानंतर ‘बॉम्बे क्वॉड्रँग्युलर टुर्नामेंट’ असे झाले.
शेवटी १९३७ मध्ये शेवटी उरलेल्या समाजांचा एक संघ बनला आणि त्याचे नाव ठेवले ‘द रेस’. या संघात बौद्ध, ज्यू, भारतीय ख्रिस्ती समाज इत्यादी लोकांचा समावेश होता. आता पाच संघ झाले; ज्यावरून या स्पर्धेला ‘बॉम्बे पेंन्टाग्युलर’ असे नाव देण्यात आले.
हे सर्व होण्याआधी मुंबईच्या फोर्टची सर्व तटबंदी तोडली गेली होती आणि एस्प्लनेड मैदानाचे चार तुकडे करण्यात आले होते. ते म्हणजे कूपरेज, ओव्हल, क्रॉस व आझाद मैदान. त्या काळी आझाद मैदानाचे नाव बॉम्बे जिमखाना, असे होते. कारण- अजूनही भारताला ‘आझादी’ (स्वातंत्र्य) मिळाली नव्हती.
मुंबईतील पहिला क्रिकेट सामना कधी आणि कुठे झाला? (When and where was the first cricket match played in Mumbai?)
पहिल्या जागतिक महायुद्धामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्व ठप्प पडलं होतं. पण, १९२६ मध्ये मेरलीबोन क्रिकेट क्लबची टीम भारतात आली होती. मुंबईत येण्याआधी हा संघ भारतातील विविध शहरांत ३४ सामने खेळला होता आणि एकही सामना तो हरला नव्हता. त्यावेळी पूर्ण हिंदुस्थानाची इज्जत मुंबईकरांच्या हातात होती. त्यावेळी मुंबईत एमसीसी विरुद्ध हिंदू, असा सामना आयोजित करण्यात आला होता.
सामन्याचं स्थळ होतं बॉम्बे जिमखाना मैदान. या जिमखान्याच्या इमारतीत भारतीयांना प्रवेश वर्ज्य होता. जरी भारतीयांना त्यांच्या मैदानात खेळण्याची अनुमती देण्यात आली होती तरी पॅव्हेलियनमध्ये त्यांना जाऊ दिलं गेलं नाही. हा सामना पाहण्यासाठी २५ हजार लोक आले होती. यावेळी एमसीसीला पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाली आणि त्यांनी ३६३ धावा काढल्या.
हिंदू संघाच्या बाजूनं मैदानात एक ३१ वर्षीय तरुण उतरला; जो होळकरांच्या सैन्यात अधिकारी होता. त्यानं ११ षटकारांसह तब्बल १५६ धावा काढल्या. त्यामुळे हिंदू संघाच्या एकूण ३६३ धावा झाल्या. या फलंदाजाचं नाव होतं सी. के. नायडू. काही जाणकार म्हणतात की, हीच भारतीय क्रिकेटची खरी नांदी होती. पुढे जाऊन नायडू भारताचे कर्णधार झाले.
१९३२ मध्ये भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडला गेला आणि त्याच्या पुढच्या वर्षी इंग्लंडचा संघ भारतात आला. तेव्हा मुंबईत क्रिकेटचं एकही स्टेडियम नव्हतं. त्यामुळे भारतातील पहिली कसोटी सामना बॉम्बे जिमखान्याच्या मैदानात आयोजित करावी लागली होती. पण, हा आंतरराष्ट्रीय सामना असल्यानं जिमखान्याच्या अधिकाऱ्यांना नाइलाजाने भारतीयांना पॅव्हेलियन वापरण्यास द्यावं लागलं. ही एक अभुतपूर्व घटना होती. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला; परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईचं नाव कोरलं गेलं.