Mumbai Local Stations Name Meaning: मुंबईची रेल्वे ही शहराची लाईफलाईन आहे. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूकच नव्हे तर त्यांच्या पोटापाण्याची सोय करण्याचे काम सुद्धा ही रेल्वे करते. मुंबईकरांना आता मध्य, पश्चिम, हार्बर लाईनवरील लोकलची एवढी सवय झाली आहे की फक्त आजूबाजूच्या बिल्डिंग बघूनही कोणतं स्टेशन येणार हे प्रवासी सांगू शकतात. तुम्हालाही कदाचित कर्जत/कसारा ते सीएसएमटी व चर्चगेट ते बोरिवली पर्यंत बहुतांश स्टेशनची नावे माहीत असतील. पण ही नावे नेमकी कशी ठरवण्यात आली हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण मुंबईच्या प्रसिद्ध रेल्वे स्थानकांच्या नावांच्या मागील रंजक कहाणी जाणून घेऊया…
चर्चगेट
मुंबईतील फ्लोरा फाउंटनच्या अगदी जवळ मुंबईत प्रवेशाचे एक दार (गेट) स्थित होते. सेंट थॉमस कॅथेड्रल हे या भागातील मुख्य चर्च होते या दोन्ही शब्दांना एकत्र करून ‘चर्च गेट’ असे नाव पडले.
घाटकोपर
घाटकोपर हे आज मध्य रेल्वे मार्गासह ईशान्य मुंबईतील एक मुख्य स्टेशन आहे. मुंबईच्या विकासाच्या आधीची चार ते पाच दशके मागे जाऊन पाहिल्यास, तुमच्या लक्षात येईल की, पश्चिम घाट आजच्या घाटकोपरपर्यंत विस्तारला आहे. म्हणूनच त्याला घाट-कोपरा असे संबोधले गेले, ज्याचा अर्थ टेकडीचा माथा असा होऊ शकतो. यावरून या भागाचे नाव घाटकोपर असे पडले .
कुर्ला
Straying Around या युट्युब अकाउंटवर सांगण्यात आले होते, मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत पावसात या भागात अधिक पाणी साचून दलदल तयार व्हायची यामुळे या भागात अनेक खेकडे पाहायला मिळायचे. खेकड्यांना स्थानिक भाषेत कुर्ली असे म्हंटले जाते म्हणून यावरून या स्थानकाचे नाव कुर्ला असे पडले.
शीव (सायन)
सायन या शहराने मुंबईची सीमा चिन्हांकित केली होती. पोर्तुगीजांनी उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेतला, तर दक्षिणेकडे ब्रिटिशांचे नियंत्रण होते. याला शीव असेही संबोधले जात होते, याचा अर्थ मराठीत सीमा असा होतो. इथल्या जमिनीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोर्तुगीजांनी त्याचा काही भाग जेसुइट धर्मगुरूंना दिला. त्यांनी बदल्यात, टेकडीवर एक चर्च बांधले, जिथे आज स्टेशन आहे आणि त्यांनी त्याला माउंट झिऑन म्हटले. कालांतराने ब्रिटीश आणि स्थानिक लोक याचा उल्लेख सायन म्हणून करू लागले, ज्या नावाने ते आजही ओळखले जाते.
हे ही वाचा<< ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ का असतो? भारतीय रेल्वेने सांगितलेल्या ‘या’ कारणाचा विचारही केला नसेल
माटुंगा
२००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटांमुळे अत्यंत स्मरणात असलेले माटुंगा स्टेशन हे मुंबई शहराचे हृदय म्हणून ओळखले जाते. माटुंगा हा मराठी शब्द मातंग किंवा हत्तीपासून आला (संस्कृत भाषांतर). 12 व्या शतकाच्या आसपास राजा भीमदेवाचे सैन्य याच भागात तैनात होते, ज्यामुळे नंतर हे नाव ठेवण्यात आले.