हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली सुपरस्टार कोण? असा प्रश्न विचारला गेला तर तुम्ही उत्तर द्याल मधुबाला किंवा नर्गिस. मात्र या दोघींच्या आधीही एक सुपरस्टार हिंदी सिनेसृष्टीत होऊन गेली. तिचं नाव काय होतं? ती कोण होती? आपण जाणून घेणार आहोत या बातमीतून.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली सुपरस्टार अभिनेत्री कोण?
दादासाहेब फाळके यांना चित्रपटसृष्टीचे जनक मानलं जातं. त्यांनी मूकपटांची निर्मिती करुन चित्रपटांचं दालन सगळ्यांसाठी खुलं करुन दिलं. तर १९३१ मध्ये आलेला आलम आरा हा पहिला बोलपट ठरला. त्यानंतरच्या काळात अशोक कुमार, के. एल. सैगल या सगळ्यांनी चित्रपटसृष्टीतले नायक रंगवले. मात्र या नावांमध्ये एका महिलेचं नावही समाविष्ट होतं जी हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिली सुपरस्टार होती. त्या महिला अभिनेत्रीचं नाव होतं मुमताज शांती.
कोण होत्या मुमताज शांती?
मुमताज शांती यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं. १९३७ मध्ये त्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत होत्या. मुमताज शांती यांनी १९४२ मध्ये पहिला सुपरहिट चित्रपट दिला. त्या चित्रपटाचं नाव होतं बसंत. या चित्रपटातील गाणीही सुपरहिट होती. या चित्रपटात काम करणाऱ्या मुमताज शांती या तेव्हा अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ७६ आठवडे चालला आणि चित्रपटाने त्या काळात मोठा नफा कमवला.
१९४३ मध्ये आलेल्या किस्मत सिनेमातही उत्तम काम
१९४३ मध्ये अशोक कुमार यांच्यासह मुमताज शांती किस्मत सिनेमात झळकल्या. किस्मत हा अशोक कुमार आणि मुमताज शांती यांचा असा चित्रपट ठरला ज्याने १ कोटी रुपयांची कमाई केली. वयाच्या १७ व्या वर्षी मुमताज शांती यांना ज्युबिली गर्ल हे बिरुद लागलं, ते कायमचंच. मुमताज यांच्या चार चित्रपटांची ज्युबिली झाली. त्यामुळे त्यांना ज्युबिली गर्ल म्हटलं जाई. तसंच किस्मत सिनेमा केल्यानंतर त्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या सुपरस्टार ठरल्या. दिलीप कुमार हे त्यांना ज्युनिअर होते. तरीही मुमताज यांनी त्यांच्यासह काम केलं. मुमताज यांचा किस्मत हा चित्रपट तीन वर्षे चित्रपटगृहांमधून हटला नव्हता. त्या काळी हा रेकॉर्ड होता जो नंतर शोले या चित्रपटाने आणि १९९६ मध्ये आलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेने मोडला. किस्मत या चित्रपटाला हिंदी सिनेसृष्टीतले सर्वाधिक पाहिले गेलेले ५० चित्रपट या यादीत स्थान मिळालं आहे.
मुमताज शांती यांनी अचानक चित्रपटसृष्टी सोडली
मुमताज शांती यांनी चित्रपट निर्माते वली साहब यांच्याशी निकाह केला. त्यानंतरही त्या चित्रपटांमध्ये काम करत होत्या. पण हळूहळू कुटुंबाला वेळ देणं ही त्यांचा प्राथमिकता होऊ लागली. १९५२ मध्ये मुमताज या त्यांच्या पतीसह आणि कुटुंबासह पाकिस्तानात वास्तव्यासाठी गेल्या. ज्यानंतर त्यांचं चित्रपटातील करिअर संपलंच. मुमताज शांती या तेव्हा फक्त २६ ते २७ वर्षांच्या होत्या. मुमताज शांती या पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये वास्तव्य करु लागल्या होत्या. १९८९ मध्ये मुमताज शांती यांचा मृत्यू लाहोरमध्ये त्यांच्या राहत्या घरी झाला.