Mysterious Waterfall In India: आपण आजवर अनेक धबधबे पाहिले असतील, प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन. दोन्ही माध्यमातून निसर्गाची ही किमया आपल्याला थक्क करून जाते. धबधब्याच्या आजूबाजूला जरी उभं राहिलं तरी पाण्याचे थंड तुषार आपल्यावर उडतात आणि तन व मनाला गारवा अनुभवता येतो. पण तुम्हाला माहित आहे का भारतात एक असा धबधबा आहे ज्याच्या खाली उभं राहूनही पाण्याचा स्पर्श व्यक्तीला होत नाही. अगदी मुद्द्याचं सांगायचं तर, पापी व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव होत नाही अशी मान्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सुद्धा एका धबधब्याची अशीच चमत्कारिक कहाणी आहे. नेमकी ही ठिकाणं कोणती चला तर पाहुयात..
भारतातील सर्वात पवित्र धबधबा
आपण आज वसुंधरा धबधब्याविषयी जाणून घेणार आहोत. बद्रीनाथ पासून ८ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून १३,५०० फूट उंचीवर हा धबधबा आहे.या धबधब्याची कहाणी अत्यंत वेगळी आहे. अगदी मोत्यासारख्या शुभ्र पाण्याचे थेंब या धबधब्यातून पडतात. साधारण ४०० मीटर उंचीवरून कोसळणारे हे पाणी मोजक्याच लोकांना भिजण्याचा आनंद देतं. इथे आलेले पर्यटक आपल्याला स्वर्गाचा भास होत असल्याचे सुद्धा सांगतात.
पवित्र धबधब्याच्या पाण्यात भिजल्यास..
असे म्हणतात की या धबधब्यावरून पाण्याचा थेंब केवळ पवित्र माणसावरच पडतो. भाविकांची अशी श्रद्धा आहे की, वसुंधरेचे पाणी अंगावर पडल्यास व्यक्ती निरोगी होते. असे म्हटले जाते की, वसुंधरेचे पाणी वनौषधींनी समृद्ध आहे आणि त्यात औषधी गुणधर्म आहेत.
अष्ट वसु (अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरीक्षा, आदित्य, डायस, सोम आणि नक्षत्रणी) आठ तत्व देवतांनी येथे ध्यान केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळेच धबधब्याला वसुंधरा असे नाव देण्यात आले आहे. येथे जाण्यासाठी भाविक व पर्यटकांना माना गावातून घोडा किंवा खेचर घेऊन जावे लागते. पांडव त्यांच्या पत्नी द्रौपदीसह या मार्गानेच स्वर्गात गेले, अशी आख्यायिका आहे. असे म्हणतात की येथे सहदेवाचा मृत्यू झाला आणि अर्जुनाने आपले धनुष्य ‘गांडीव’ सोडले.
हे ही वाचा<< भारतातील कोणत्या शहरात बनलं आहे तुमच्या खिशातील नाणं? ‘या’ एका खुणेवरून ओळखा
दरम्यान, महाराष्ट्रात सुद्धा मार्लेश्वरच्या धबधब्याची अशीच कहाणी आहे. या धबधब्याच्या खाली उभे राहून ओम नमः शिवायः असे म्हणताच धबधब्याचे पाणी अंगावर पडते अशी श्रद्धा आहे.