१५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. हा आपल्या देशाचा राष्ट्रीय सण असल्याने आतापासून त्याची देशभरात जोरदार तयारी केली जात आहे. १५ ऑगस्टनिमित्त देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे याशिवाय सरकारी इमारती, खासगी कार्यालये इत्यादी ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जातो. याबाबत भारत सरकारने नियम केले आहेत. २००२ मध्ये भारत सरकारने भारतीय ध्वज संहिता लागू केली. या संहितेत तिरंगा फडकवणे आणि उतरवणे या संदर्भात काही नियम नमूद करण्यात आले आहेत. हे नियम नेमके काय आहेत ते जाणून घेऊ …

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिरंगा फडकवण्याचे आणि उतरवण्याचे काय आहेत नियम?

१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यासाठी काही विशेष नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांनुसार ध्वजारोहणासाठी अशा व्यक्तीची निवड करावी; जी नियमांचे पालन करीत ध्वजरोहण करील. नेहमी सूर्यास्ताच्या आधी ध्वज फडकवायला हवा. कारण- सूर्यास्तानंतर निषिद्ध आहे. तिरंगा फडकवण्यासोबतच तो उतरवताना विशेष काळजी घ्यावी लागते. तिरंगा कुठेही फाटलेला आणि मळलेला नसावा.

भारतीय ध्वज संहिता काय आहे?

२६ जानेवारी २००२ रोजी भारतीय ध्वज संहिता लागू करण्यात आली. या अंतर्गत अनेक नियम लागू करण्यात आले. हे नियमांमधील महत्वाचे नियम जाणून घेऊ…

१) ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जाईल, ती जागा योग्य असावी. तिरंगा सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फडकवावा.

२) कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल, तर त्याची जागा तिरंग्याच्या खाली असावी.

३) तिरंगा फडकवण्याच्या वेळेस बिगुलचा वापर करावा.

४) तिरंगा कोणत्याही कारणामुळे कापला किंवा फाटला, तर तो नियमानुसार नष्ट करावा.

५) एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल, तर वक्त्याने समोर पाहावे आणि ध्वज उजवीकडे असावा.

६) ध्वजाचा आकार आयताकृती असावा आणि त्याची लांबी व रुंदीचे गुणोत्तर ३:२ असे असावे. तसेच ध्वजावरील अशोक चक्रामध्ये २४ आरे असणे आवश्यक आहे.

७) तिरंग्याचा कोणत्याही प्रकारे जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये.

८) २००२ मध्ये भारतीय ध्वज संहिता लागू होण्यापूर्वी, २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट रोजी सामान्य लोक तिरंगा फडकवत होते. पण, आता नवीन नियमांमुळे कोणतीही व्यक्ती मर्यादित स्वरूपात केव्हाही तिरंगा फडकवू शकते.

तुम्हीही यावेळी ध्वज फडकवणार असाल, तर तुम्ही भारतीय ध्वज संहिता २००२ च्या नियमांनुसार ध्वज फडकवू शकता. ध्वज फडकवल्यानंतर ध्वज उतरवतानाही नियमांचे पालन करा आणि नियमानुसार देशातील हा सर्वांत मोठा राष्ट्रीय सण साजरा करा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National flag what is flag code of india 2023 who teach rule to keep indian national flag safe know details sjr