National Technology Day 2023: ११ मे हा प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. १९९८ पासून ११ मे रोजी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेले प्रगती आणि त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बहुमूल्य योगदानाचे स्मरण राहावे या उद्देशाने हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. ११ मे १९९८ रोजी अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे जगासमोर भारताने आपली खरी ताकद दाखवली होती. त्या ऐतिहासिक घटनेची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस; साजरा करणे अधिक महत्त्वपूर्ण समजले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिल्यांदा अणु चाचणी केली होती. या मोहिमेला Smiling Buddha असे नाव देण्यात आले होते. आपल्या देशाला अण्वस्त्र संबंधितचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट चाचण्या करण्याची गरज होती. परंतु त्यावेळी आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि राजकीय कारणांमुळे अणु चाचण्या करण्यामध्ये अडचणी येत होत्या. पुढे १९९८ मध्ये पाच यशस्वी अणु चाचण्या करुन भारताने जगाला आपली खरी ताकद दाखवून दिली. लगेच दोन दिवसांनी दोन नवीन अण्वस्त्रांची चाचणीदेखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्त्व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम करत होते.

पोखरणमध्ये मिळालेला विजय साजरा करत तेव्हाचे तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताला आण्विक राष्ट्र घोषित केले होते. यामुळे यशस्वी अणुचाचणी करणाऱ्या राष्ट्रांच्या गटामध्ये भारताने प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला होता. ११ मे १९९८ मध्ये पोखरणमध्ये घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या गोष्टीचे निमित्त साधत देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातील पहिल्या स्वदेशी विमानाचे यशस्वी उड्डाण

११ मे १९९८ रोजी पोखरण चाचणी व्यतिरिक्त आणखी काही कारणांसाठी खास होता. या दिवशी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्याशिवाय भारतातील पहिले स्वदेशी विमान हंसा-३ या विमानाने पहिल्यांदा भरारी घेतली होती. वैमानिकांचे प्रशिक्षण, हवाई छायाचित्रण आणि पर्यावरणीय प्रकल्पांसाठी हे विमान वापरले जाणार होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National technology day 2023 why national technology day is celebrated on may 11 in india know history significance yps