Navratri 2024: नवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या आनंदात, जल्लोषात साजरा केला जातो. यंदा ३ ऑक्टोबर २०२४ पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. गरबा आणि दांडिया खेळायला आवडणारे प्रत्येक जण आता नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रुपांची विधीवत पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया नृत्य प्रकाराची परंपरादेखील साजरी केली जाते. विशेषत: गुजरातमध्ये गरबा आणि दंडिया नृत्याची मोठी परंपरा आहे, पण हल्ली मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोठ्या गरबा आणि दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. पण, तुम्हाला गरबा आणि दांडिया या दोघांमधील फरक नेमका काय आहे? किंवा नवरात्रोत्सव काळातच गरबा आणि दांडिया का खेळले जातात, माहितेय का? आजच्या लेखात तेच आपण जाणून घेणार आहोत.

नवरात्रोत्सव काळात सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे गरबा आणि दांडिया. घागरा, चोळी आणि पारंपरिक दागिने परिधान करून अतिशय जल्लोषात आणि ऊर्जेने हे नृत्यप्रकार केले जातात. पण, या दोन्हींमध्ये फरक आहे. गरबा नृत्य हे देवीची आरती होण्यापूर्वी केले जाते, तर दांडिया नृत्य देवीच्या आरतीनंतर केले जाते. यामुळे गरबा आणि दांडियामध्ये मोठा फरक आहे. गरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्यांची निर्मिती गुजरातमध्ये झाली आहे.

Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्री किती तारखेपासून सुरू होत आहे? घ्या जाणून घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी

गरबा आणि दांडिया हा एक नृत्य प्रकार असण्याबरोबर तो करण्यामागे काही धार्मिक महत्त्वदेखील आहे. गरबा नृत्य प्रकार वेगवेगळ्या प्रकारे सादर केला जातो. यातील अनेक स्टेप्स करायलादेखील फार कठीण असतात, त्यामुळे अनेक लोक क्लासेल लावून गरबा नृत्याच्या कठीण स्टेप्स शिकून घेतात. गरबा पारंपरिक दिव्यांभोवती सादर केला जातो.

गरबा हा शब्द गर्भ शब्दापासून आला आहे. मातेच्या गर्भावस्थेत असणाऱ्या मुलाच्या जीवापासून हा शब्द बनला आहे. गरबा नृत्याच्या माध्यमातून लोक आपल्या जीवनाचे चक्र दर्शवतात. यात लोक टाळ्या वाजवून गोल-गोल फिरत हे नृत्य करतात.

देवीवर आधारित गाण्यावर हा गरबा नृत्य प्रकार करतात. गरबा नृत्य हे नेहमी गोल फिरून विशिष्ट पद्धतीने केले जाते. या नृत्य प्रकारासाठी जागेची गरज कमी असते. हे नृत्य मंदिराच्या आवारातदेखील करता येते. जेव्हा गरबा आणि दांडिया नृत्य प्रथेला सुरुवात झाली तेव्हा फक्त स्त्रियाच हा नृत्य प्रकार करायच्या, पण आता मात्र स्त्रियांप्रमाणे पुरुषही गरबा खेळतात.

तर दांडिया हा नृत्य प्रकार माता दुर्गा आणि महिषासुर यांच्यातील युद्धाचं प्रतीक आहे. त्यामुळे लोक तलवारींऐवजी रंगीबेरंगी काठ्या घेऊन नाचतात. एकमेकांशी हा नृत्य प्रकार खेळण्यासाठी काठ्यांचा वापर करतात. यावेळी तालात नाचण्यासाठी विशेषत: राधा-कृष्ण आणि कृष्ण-लीलांवर आधारित गाणी लावली जातात.

अतिशय मोठ्या जागेत हा नृत्य प्रकार केला जातो. काठ्यांच्या साहाय्याने, एकट्याने किंवा जोडीने दांडिया खेळू शकतो.

धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे नऊ दिवस दररोज सायंकाळी मातेची पूजा केल्यानंतर तेथे उपस्थित भाविक दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर दांडिया खेळतात. गुजरातसह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचा आवाज ऐकू येतो. यानिमित्ताने मित्र, कुटुंब किंवा नव्या लोकांसह नाचण्याचा आनंद घेता येतो.