What Is Netflix Email Scam: गेल्या काही वर्षांपासून जगभरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. यामध्ये अज्ञातांना कॉल करण्यापासून ते फेक आणि लिंक्स पाठवण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धीतींचा समावेश आहे. आता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची नवी पद्धत अवलंबून फिशिंग ईमेलद्वारे नेटफ्लिक्स युजर्सना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या फसवणुकीत, यासबर गुन्हेगार ईमेलद्वारे फिक्सिंग मेसेजेस पाठवत आहेत.
कसा होतो नेटफ्लिक्स ईमेल स्कॅम?
हा नेटफ्लिक्स स्कॅम ‘लेट्स टॅकल युअर पेमेंट डिटेल्स’ या विषयाच्या ईमेलने सुरू होतो. हा स्कॅम आणखी धोकादायक बनवणारी गोष्ट म्हणजे, सायबर गुन्हेगारांनी या ईमेलमध्ये नेटफ्लिक्स ब्रँडिंग, रंग आणि फॉन्टचा जसाच्या तसा वापर केला आहे.
ईमेल उघडल्यानंतर, युजरला सांगण्यात येते की, बिलिंगच्या समस्येमुळे त्यांचे नेटफ्लिक्स खाते होल्डवर आहे. सेवेतील व्यत्यय टाळण्यासाठी युजरला त्याचे पेमेंट तपशील त्वरित अपडेट करण्यास सांगितले जाते. या मेलमध्ये लाल रंगाचा बॅनर देखील आहे ज्यावर “अकाउंट अपडेट नाऊ” असे लेबल असलेले कॉल-टू-अॅक्शन बटण आहे, जे ते नेटफ्लिक्स पेजसारखेच दिसते.
ही फसवणूक कशी टाळायची?
- नेहमी ईमेल तपासा आणि पाठवणाऱ्याचा ईमेल अॅड्रेस पहा आणि वेबसाइटचा URL तपासा.
- नेटफ्लिक्स कधीही ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे पासवर्ड, क्रेडिट कार्ड तपशील किंवा बँक तपशील विचारत नाही.
- जर तुम्हाला संवेदनशील माहिती विचारणारा ईमेल आला तर कोणताही लॉगिन तपशील प्रविष्ट करण्यापूर्वी वेबसाइट लिंक तपासा.
- जर नेटफ्लिक्स लिंक “https://www.netflix.com” ने सुरू होत नसेल, तर तुमची फसवणूक होत आहे असे समजा.
- संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा.
- जर तुम्हाला ईमेल अवैध असल्याचा संशय असेल परंतु पेमेंट तपशील अपडेट करायचे असतील, तर ईमेलमधील लिंक्सवर क्लिक करण्याऐवजी मॅन्युअली अॅड्रेस टाइप करून थेट नेटफ्लिक्स वेबसाइटवर जा.
- जर तुमची फसवणूक झाली असेल तर त्वरित कारवाई पाऊले उचला.
- जर तुम्ही चुकून बनावट साइटवर तुमची माहिती प्रविष्ट केली तर तुमचा नेटफ्लिक्स पासवर्ड ताबडतोब बदला.