पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी नवीन संसदेचं उद्घाटन केलं. या उद्घाटनाचे व नवीन संसद भवनाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. या नवीन भव्यदिव्य संसदेबद्दलची चर्चा ऐकल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनाही इथे भेट द्यावीशी वाटते. तुम्हालाही संसद आतून पाहायची असेल, संसदेचे कामकाज पाहायचे असेल, तर त्यासाठी प्रक्रिया काय असते आणि एंट्री पास कसा बनवला जातो, ते जाणून घेऊयात.
संसदेत कुणीही जाऊ शकतं का?
‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, तुम्ही हवं तेव्हा संसदेत जाऊ शकत नाही. संसदेत जाण्यासाठी एक वेगळी प्रक्रिया असते, ज्याद्वारे तुम्हाला प्रवेश दिला जातो. नवीन संसदेत सामान्य लोकांच्या प्रवेशाबाबत कोणतीही अधिसूचना आलेली नाही, परंतु संसदेच्या कामकाजादरम्यान लोक संसदेत जाऊ शकतात. संसदेत सामान्य लोकांना संसदेचे कामकाज पाहण्यासाठी प्रवेश दिला जातो, ज्यासाठी सभागृहात एक प्रेक्षक गॅलरी आहे, तिथून लोक सभागृहाचे कामकाज पाहू शकतात. अशाच व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना नवीन संसदेचं कामकाजही पाहता येईल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे याबद्दल माहिती येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
संसदेत प्रवेश कसा मिळतो?
सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी संसदेत प्रवेश करण्यासाठी पास काढावा लागतो. तो एकट्या व्यक्तीसाठी किंवा ग्रुपसाठीही बनवता येतो. काही वेळा शाळकरी मुलांनाही संसदेत नेलं जातं, त्यांच्यासाठी वेगळा पास बनवला जातो. हे पास संसद सचिवालयातून बनवले जातात. तसेच, तुम्ही कोणत्याही खासदारामार्फतही संसदेत जाऊ शकता. त्यासाठी त्या भागातील खासदाराशी बोलू शकता. खासदाराने शिफारस केल्यास तुम्हाला संसदेत जाण्यासाठी पास मिळू शकतो.
संसद संग्रहालयासाठी पासची गरज नाही
तुम्हाला संसद संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर तुम्ही यासाठी थेट प्रवेश घेऊ शकता. यासाठी तुम्हाला वेगळ्या पासची गरज नाही आणि सुट्टीचे दिवस वगळता तुम्हाला हे संग्रहालय पाहता येऊ शकतं. इथे तुम्हाला संसद आणि पंतप्रधानांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या वस्तू पाहायला मिळतात. दुसरीकडे सध्या नवीन संसदेत सामान्य लोकांना जाता येईल की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.