करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच अचानक ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. हा व्हेरिएंट वेगाने आपलं रुप बदलत असून तो अधिक धोकादायक असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या नव्या व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) काही निरिक्षणे नोंदवली आहेत.
१. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा नवा व्हेरिएंट एकदा करोना होऊन गेलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक ठरेल. एकदा बाधित होऊन त्यातून बरे झालेले लोक या व्हेरिएंटसाठी अधिक पोषक आहेत.
२. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार डेल्टा आणि इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने होतो की नाही याबद्दल मात्र अद्याप ठोस काही उत्तर मिळालेलं नाही. सध्या तरी RTPCR चाचणीच्या माध्यमातूनच या व्हेरिएंटबद्दलची माहिती मिळत आहे.
हेही वाचा – जगभरात दहशत पसरवणाऱ्या ‘ओमिक्रॉन’ची लक्षणं काय? चाचणी कशी करतात? जाणून घ्या…
३. या नव्या व्हेरिएंटचा लसींवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आपल्या तांत्रिक भागीदारांसोबत काम करत आहे.
४. ओमिक्रॉनची लागण झाल्याचे गंभीर परिणाम होतील की नाही, याबद्दलची ठराविक माहिती समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी आहेत, याबद्दलही कोणती माहिती मिळालेली नाही.
५. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, परंतु हे ‘ओमिक्रॉन’च्या विशिष्ट संसर्गाच्या परिणामाऐवजी संक्रमित झालेल्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे असू शकते. सुरुवातीला नोंदवल्या गेलेल्या निरिक्षणांनुसार, लागण झालेल्या तरुणांमध्ये विषाणूची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. मात्र ओमिक्रॉनची तीव्रता समजण्यासाठी अजून काही आठवड्यांचा कालावधी लागेल.