Republic Day | Tallest Flags in India: आज २६ जानेवारी रोजी आपण भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या शुभ प्रसंगी आपण देशातील सर्वात मोठ्या तिरंग्याबद्दल जाणून घेऊ. देशातील सर्वात मोठा ध्वज २०२३ मध्ये अटारी-वाघा बॉर्डर, पंजाब येथे उभारला गेला होता. तसंच या यादीत पुणे, कर्नाटक, कोल्हापूरदेखील आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी, भारतातील पाच सर्वात उंच ध्वजस्तंभ असलेल्या ठिकाणांची यादी पाहूया:
अटारी-वाघा बॉर्डर, पंजाब (४१८ फूट)
अटारी-वाघा बॉर्डरवर २०२३ मध्ये भारताचा सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला गेला. ४१८ फूट उंच असलेला हा ध्वज पाकिस्तानच्या ध्वजापेक्षा १८ फूट उंच आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हस्ते या ध्वजाचे उद्घाटन अमृतसरमध्ये करण्यात आले.
बेळगाव, कर्नाटक (३६१ फूट)
कर्नाटकमधील कोटे केरे येथील बेळगाव किल्ल्यावर ११० मीटर (३६१ फूट) उंचीचा भारतातील सर्वात उंच ध्वजस्तंभ आहे. २०१८ मध्ये जिल्हा प्रभारी मंत्री रमेश जरकीहोली यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे अनावरण करण्यात आले. येथील भारतीय ध्वज वेदरप्रूफ डेनियर पॉलिस्टर फॅब्रिक वापरून बनवला जातो.
भक्ती शक्ती, पुणे (३५१ फूट)
निगडी येथे स्थित, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) २०१८ मध्ये भक्ती शक्ती ध्वजाची स्थापना केली. १०७ मीटर किंवा ३५१ फूट उंच असलेल्या या ध्वजस्तंभाचे वजन ४२ टन आहे आणि ध्वज विणलेल्या पॉलिस्टरने बनलेला आहे. हा झेंडा ताशी २५ किमी वेगाने आलेले वारे सहन करू शकतो, असे म्हटले जाते.
गुवाहाटी
अनेकांना माहीत नसेल, पण गुवाहाटी हे या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या ध्वजाचे उद्घाटन महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते. महात्मा गांधींच्या गांधी मंडप स्मारकातील सारानिया टेकडीवर ३१९.५ फूट उंच उभा असलेला हा ध्वज पाहण्यासारखा आहे. याला अनेक पर्यटक भेट देतात.
कोल्हापूर
कोल्हापूर हे भारतातील पाचव्या उंच ध्वजस्तंभाचे घर म्हणून ओळखले जाते. येथे भारतीय ध्वज ३०३ फूट उंच फडकतो. हा ध्वज कसबा बावडा येथील पोलिस उद्यानात असून तो प्रथम महाराष्ट्रदिनी फडकवण्यात आला. येथील ध्वजस्तंभ ९० मीटर उंच आणि २४ टन वजनाचा आहे.