विमान प्रवासाबाबत प्रत्येकालाच कुतूहल असतं. ज्यांनी कधीच प्रवास केला नाही त्यांच्यासाठी या प्रवासाबाबत जाणून घेणं रंजक असतं. तर जे सातत्याने विमान प्रवास करतात त्यांनाही तिकिटात सवलत मिळावी म्हणून ते अनेक पर्याय अवलंबून पाहत असतात. विमानाची तिकिटे इतर वाहतुकीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतात. त्यामुळे ती प्रत्येकालाच परवडतात असे नाही. पण कधी कधी अचानक कमी कालावधित एखादा लांबचा पल्ला गाठायचा असेल तर विमान प्रवास सुखकर आणि सोयीचा ठरतो. पण अशावेळी तिकिट कधी बुक करायची, जेणेकरून तिकिट कमी किंमतीत मिळतील हा प्रश्न पडतो. तुमचा हाच प्रश्न आम्ही सोडवला आहे.
तज्ज्ञांच्या मते विमान प्रवासासाठी तुम्ही मंगळवारी तिकिटे बुक केली तर तुम्हाला सवलतीत तिकिटे मिळू शकतील. कारण, सोमारी रात्री विमान कंपन्या त्यांच्या आठवड्याच्या विक्री किमती जाहीर करतात, त्यामुळे मंगळवारी तिकिटे स्वस्त होता. मंगळवारी तिकिटे बुक केल्यास तुमची जवळपास ६ टक्के बचत होऊ शकते. पण ही सवलत प्रत्येक विमान कंपनी किंवा विमान रुटसाठी लागू असेल असं नाही. तुमचं गंतव्यस्थान आणि तुमचा प्रवासाचा दिवस यामुळेही तुमच्या तिकिटाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ किंवा घट होऊ शकते.
रविवार आणि गुरुवारीही मिळतील स्वस्ते तिकिटे
तसंच, नवीन अभ्यासातून असं सिद्ध झालंय की रविवार आणि गुरुवारी तिकिटे बुक केल्यास तुम्हाला अधिक सवलत मिळू शकते. गुरुवारी बहुतेक बाजारपेठांमध्ये किंमती कमी असतात. गुरुवारी देशांतर्गत विमान प्रवासात तुम्ही ३.४ टक्के आणि आंतरराष्ट्रीय बचत ३.५ टक्के बचत करू शकता.
तुम्ही जर देशांतर्गत प्रवास करत असाल तर विमानतळानुसारही तुमचा स्वस्त ठरवता येऊ शकेतल. पण ही युक्ती आंतरराष्ट्रीय उड्डांणासाठी वापरता येणार नाही. तसंच, रविवारी विमान प्रवास करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण, या दिवशी विमान तिकिटे प्रचंड महाग असतात.
शुक्रवारी मिळतात महाग तिकिटे
ज्याप्रमाणे एखाद्या दिवशी तुम्हाला सवलत मिळू शकते, त्याचप्रमाणे एखादा वार असाही असतो ज्या दिवशी तुम्ही तिकिटे बुक केल्यास तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. शुक्रवारी पहाटे ३ वाजता तिकिटांच्या किंमती ३ टक्क्यांनी वाढतात. ही तफावत कदाचित विमान कंपन्या त्यांच्या विक्रीचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीमुळे असेल.