Transgender Married To God Ritual In Indian Village: भारतात तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) समुदायासाठी अनेक कायदे केले गेले, अधिकार रक्षणासाठी संस्था अस्तित्वात आल्या पण तरीही ‘तृतीयपंथी’ शब्दाला जोडून येणारी नकारात्मक प्रतिक्रियांची झालर निषेध रूपात समाजात कायम आहे. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्याच भारतात एक असं गाव आहे जिथे या तृतीयपंथीय समुदायासाठी आयुष्य बदलून टाकणारा एक सोहळा दरवर्षी पार पडतो. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात असलेल्या कूवागम गावातील कूथंडवर (अरवण) देवतेचे मंदिर तृतीयपंथींच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. तमिळ मास ‘चित्राई’ (एप्रिल किंवा मे) मध्ये हा १८ दिवस साजरा होणारा उत्सव आयोजित केला जातो .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाभारतात रुजलेली मोहिनी अवताराची मुळं

शतकानुशतके साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाची मुळे महाभारताच्या दंतकथेतही रुजलेली आहेत. महाभारताच्या युद्धाच्या १८ व्या दिवशी, पांडवांना युद्ध जिंकण्यासाठी देवी कालीसमोर योद्ध्याचे बलिदान द्यावे लागणार होते. यावेळी अरावण/कूठंडवरने स्वेच्छेने प्राणत्याग करायचा निर्णय घेतला पण त्याच वेळी त्याने भगवान कृष्णासमोर एक अंतिम इच्छा व्यक्त केली. ही इच्छा म्हणजे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याचे लग्न व्हावे. अरावणाशी लग्न करण्यासाठी कोणतीही स्त्री पुढे आली नाही कारण तसे केल्यास त्या स्त्रीला पती विरह होऊन विधवेचे आयुष्य जगावे लागले असते. यावेळी अरावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने ‘मोहिनी’ अवतार घेतला आणि हा विवाह पार पडला.

तृतीयपंथीचा विवाह व विधुरत्व

२१ व्या शतकात विल्लुपुरम जिल्ह्यापासून २०० किमी उत्तरेला वसलेल्या गावात तृतीयपंथी स्वत:ला कूठंडवरची वधू मानून उन्हाळ्याच्या महिन्यात विवाह करतात. उत्सवाच्या १७ व्या दिवशी, तृतीयपंथी नववधूंचा शृंगार करतात आणि त्यांच्या गळ्यात पवित्र धागा (मंगळसूत्र) परिधान करतात यानंतर त्यांना स्वतःला परमेश्वराची पत्नी म्हणून जगण्याचे भाग्य लागते असे म्हणतात. या उत्सवात तृतीयपंथी समुदाय त्यांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत सादर करत आनंद साजरा करतात. १७ व्या दिवशीच्या आनंदोत्सवानंतर १८ व्या दिवशी, अरावणाचा बळी देऊन आणि नंतर त्याच्या नववधूंना विधवा करून सणाची सांगता होते. नववधू त्यांच्या बांगड्या फोडतात, पवित्र धागा कापतात आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूबद्दल शोक करतात.

हे ही वाचा<< ‘फ्लाईंग किस’ शब्दाची उत्पत्ती वाचून व्हाल थक्क, सुरुवातीला किसिंगवरून कसं ठरायचं समाजातील स्थान?

आजवरच्या इतिहासात कूवागम हे तृतीयपंथींना समाजातील एक महत्त्वाचा भाग म्हणून स्वीकारणारे एक महत्त्वाचे गाव ठरले आहे. अगदी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ मधून सुद्धा या उत्सवासाठी अनेक तृतीयपंथी या गावात येतात. एक सांस्कृतिक उत्सव म्हणून परंपरेचे पालन करणाऱ्या या उपक्रमाला सामाजिक कार्याची सुद्धा सोनेरी झालर आहे. या उत्सवाच्या दरम्यान अनेक रक्तदान शिबिरे, STD (सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीज) बद्दल जागरूकता कार्यक्रम यांसारखे उपक्रम आयोजित केले जातात. अलीकडच्या काळात या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून ‘मिस कूवागम’ नावाची ट्रान्सजेंडर सौंदर्य स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only indian village where transgenders get married and become widow next day mahabharata tradition mohini avtar history svs