History of Shampoo Word: सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराय, काहे घबराय… हे गाणं आपल्यापैकी अनेकांनीच ऐकलं असेल. किंबहुना अनेकांचं हे गाणं आवडतही असेल. या गाण्याच्या सुरुवातीला मालिश, तेल मालिश, चंपी असे शब्द आहेत. या शब्दांचा आणि शॅम्पू शब्दाचा ऋणानुबंध सखोल आहे.

शॅम्पूची व्युत्पत्ती संस्कृतमध्ये

आपण रोजच्या जीवनात वापरत असलेला ‘शॅम्पू’ हा शब्द इंग्रजीच आहे असा समज अनेकांचा आहे. परंतु, फार थोड्या लोकांना माहिती आहे की, या शब्दाची व्युत्पत्ती आपल्या भारतीय संस्कृतीत, विशेषतः संस्कृत भाषेत झाली आहे. या शब्दामागे ऐतिहासिक आणि भाषिक प्रवास आहे.

‘चम्पू’ शब्दाचा अर्थ

संस्कृतमध्ये ‘चंपू’ (चम्पू) म्हणजे मालिश करणे किंवा मर्दन करणे. प्राचीन भारतात डोक्याला तेल लावून मालिश करण्याची परंपरा फार जुनी आहे. तेल लावून हलक्या हाताने डोक्यावर किंवा शरीरावर मर्दन करणे म्हणजे ‘चम्पू’ असे म्हणत असतं. ही क्रिया केवळ शरीराच्या आरामासाठीच नव्हे, तर मानसिक शांततेसाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.

ब्रिटिश भारतातील ‘चम्पू’चा परिचय

१७ व्या ते १८ व्या शतकात जेव्हा इंग्रज व्यापारी आणि नंतर राजकीय अधिकारी भारतात आले, तेव्हा त्यांनी भारतीय जीवनशैलीतील अनेक गोष्टी अनुभवल्या. त्यात एक अत्यंत लोकप्रिय सेवा होती ती म्हणजे डोक्याचे तेल-मालिश करणे. भारतीय बाजारपेठांमध्ये प्रवास करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना चम्पी करणारे म्हणजेच तेलाने मसाज करणारे स्थानिक व्यावसायिक सहज दिसत असत. त्यावेळी या मर्दन सेवेला ‘चंपू’ किंवा ‘चांपो’ (champo) असे म्हणत.

‘चंपो’ ते ‘शॅम्पू’

इंग्रजांनी भारतात अनुभवलेल्या या ‘चम्पू’ क्रियेमुळे प्रेरित होऊन, ‘चांपो’ हा शब्द इंग्लंडमध्ये नेला. १८१४ साली एका बंगालमध्ये जन्मलेल्या सूदूरपूर्व आशियाई वंशाच्या व्यावसायिकाने लंडनमध्ये ‘शॅम्पूइंग’ सेवा सुरू केली. त्यामुळे हळूहळू ‘शॅम्पू’ (Shampoo) हा शब्द इंग्रजीत रूढ झाला. मूळच्या तेलाने डोक्याला मालिश करणे या अर्थाऐवजी पुढे ‘केस धुण्यासाठी वापरणारे द्रव किंवा साबणयुक्त उत्पादन’ या अर्थाने या शब्दाचा उपयोग वाढत गेला.

आजचा शॅम्पू आणि त्याचा बदललेला अर्थ

आज आपण ‘शॅम्पू’ म्हटलं की, केस स्वच्छ धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॅन्सी बाटल्यांचा विचार करतो. परंतु, त्या चमकदार बाटल्यांमागे असलेला शब्द एका साध्या, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक ‘संकल्पनेतून जन्मलेला आहे.

चम्पू ते शॅम्पू

एकुणातच ‘चंपू’ (चम्पू) म्हणजे संस्कृतमधील मालिश करणे आणि ‘Shampoo’ म्हणजे इंग्रजीमध्ये रूढ झालेला शब्द, सुरुवातीला मालिशसाठी, नंतर केस धुण्याच्या उत्पादनासाठी प्रचलित झाला.