Orthosomnia : आपण रोज योग्य प्रकारे झोप घेत आहोत का? हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक स्मार्ट वॉच, मोबाइल मधली अॅप्स या सगळ्याचा वापर करुन झोप घेण्याचा प्रयत्न, त्यातल्या नियमांचं पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र निद्राविषय तज्ज्ञांना यातून वेगळीच काळजी वाटू लागली आहे. ती काळजी आहे. ऑर्थोसोमनिया हा विकार जडण्याची. चांगली झोप घेण्याच्या नादात अनेक लोक निद्रानाशाचा विकार जडवून घेत आहेत असं आरोग्यविषयक तज्ज्ञांना वाटतं आहे. दरम्यान ऑर्थोसोमनिया काय आहे हे आपण जाणून घेऊ.

ऑर्थोसोमनिया काय आहे?

फिटनेस ट्रॅकरनुसार किंवा मोबाइलच्या अॅपमध्ये आपण झोप योग्य प्रकारे घेत आहोत की नाही? आज आपली किती झोप झाली? आज आपण कमी का झोपलो? आज आपली झोप जास्त झाली का? या नादात लोक आपल्या झोपेचं खोबरं करुन घेत आहेत. ऑर्थोसोमनिया ( Orthosomnia ) हा शब्द ऑर्थो आणि सोमनिया या शब्दांपासून तयार झाला आहे. ऑर्थोचा अर्थ सरळ आणि सोमनियाचा अर्थ झोप असा होतो. थोडक्यात हा विकार जडणं हे निद्रानाश जडण्यासारखं आहे.ओर्थोसोमनिया हा एक प्रकारचा सोशल जेट लॅग प्रमाणेच आहे. आपण योग्य झोप घेत आहोत ना? हे पाहण्याची, अकारण वारंवार तपासण्याची सवय लागणे म्हणजे हा विकार ( Orthosomnia ) जडणे.

२०२० मध्ये झालेलं एक संशोधन काय सांगतं?

२०२० मध्ये ऑर्थोसोमनियावर ( Orthosomnia ) एक अभ्यास करण्यात आला. ज्यानुसार हे निरीक्षण नोंदवण्यात आलं की झोपेसंदर्भातले विकार जगभरात वेगाने वाढत आहेत. स्मार्ट फोन वापरणं आणि कामाचा ताण यामुळे लोक झोप ( Orthosomnia ) पूर्ण करु शकत नाहीत. तर काही लोक असे आहेत ज्यांना झोप नियंत्रणात आणून ती परफेक्ट करायची आहे. त्यामुळे ते लोक जास्त संवेदनशील होतात आणि झोपेचे प्रकार कुठले?, त्यासाठी आपण योग्य आहार घेतोय का? स्लीप ट्रॅकिंग डिव्हाईस, स्मार्टवॉच, मायक्रोफोन, एक्सेलेरोमीटर यासारखी अॅप आणि डिव्हाईस वापरत आहेत. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/ या वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे.

ऑर्थोसोमनिया नावाचा एक विकार आहे जो तुमच्या झोपेचं खोबरं करतो. जाणून घ्या याविषयी (प्रतीकात्मक फोटो- Freepik)

ऑर्थोसोमनियामुळे काय समस्या उद्भवू शकतात?

१) आपण झोप नीट घेत आहोत की नाही हे लोक ट्रॅक करत आहेत. त्यामुळे त्यांची झोप नीट होत नाही.

२) आपल्याला झोप कधी लागते आणि जाग कधी येते हे तपासण्याची सवय आणि त्याच्या वेळा नियमित करण्याची सवय लागते, त्यामुळे निद्रानाशाचा धोका

३) झोपण्याच्या आधी झोप बरोबर घेतोय ना? हा तणावात, त्यामुळे झोप न लागणे

४) जाग आल्यानंतरही दिवस आळसावलेला वाटणे, झोप येणे

५) दिवसभर झोपून रहावं, काहीही काम करु नये असं वाटणं

६) रात्री म्हणजेच जेव्हा प्रत्यक्ष झोप घेण्याची वेळ आहे तेव्हा झोप न येणं

७) दिवसा झोप लागली तरीही ताडकन उठून बसणं

८) बैचेन वाटणं आणि चिडचिडेपणा वाढीला लागणं

या समस्या लोकांना उद्भवू शकतात. व्यवस्थित झोप घ्या, फार विचार करु नका हाच यावरचा साधासोपा मार्ग आहे. तसंच ट्रॅकर किंवा डिव्हाईस लावून झोप मोजत बसू नका, ते करत असाल तर ती सवय सोडा असे काही उपाय आरोग्य तज्ज्ञांनी सुचवले आहेत.