Pakistan Electricity Rates: भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात महागाईमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानातील सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. येथील लोकांना कुटुंब चालवणं म्हणजे तारेवरची कसरत वाटू लागलं आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच असून, पेट्रोल दरवाढीनंतर आता वीज दरवाढीचा शॉक नागरिकांना बसला आहे.
पाकिस्तानातील प्रत्येकाला विजेच्या दरांसह सर्वच वस्तूंच्या वाढत्या किमतींचा सामना करावा लागत आहे. किंबहुना, पाकिस्तानातील विजेचे दर इतके वाढले आहेत की, अशा स्थितीत अनेक लोकांना वीज चोरी करणं भाग पडलं आहे. मग तुम्हालाही प्रश्न पडलं असेलच ना, पाकिस्तानात विजेचे दर नेमके किती आहेत, चला तर आज आपण जाणून घेऊया…
(हे ही वाचा : भटके कुत्रे माणसांवर हल्ले का करतात? चावा घेतल्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा यावर काय सांगतो… )
पाकिस्तानात विजेचे दर काय आहेत?
पाकिस्तानच्या नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी ऑथॉरिटी (NEPRA) ने ३.२८ रुपये प्रति युनिटने वीज दर वाढवण्याचा नुकताच निर्णय घेतला. पाकिस्तानच्या प्राधिकरणाने वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी असा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत होते. या किमती ऑक्टोबरपासून लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानमधील विजेचे प्रति युनिट दर स्लॉटनुसार आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही १०० युनिटपेक्षा कमी वीज खर्च केल्यास, तुम्हाला कमी दर द्यावा लागेल आणि तुम्ही जितके जास्त युनिट खर्च करता, त्यानुसार तुम्हाला जास्त दर द्यावा लागेल. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये प्रति युनिट विजेची किंमत ५० रुपयांपर्यंत आहे.
गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानात विजेच्या दरात मोठी वाढ होत आहे. काही महिन्यांतच वीज २० रुपयांनी महाग झाली आहे. पूर्वी हा दर ३५-३८ रुपये प्रति युनिट होता, तो आता ५० रुपयांवर पोहोचला आहे. तथापि, हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. अशा स्थितीत या महागाईमुळेच आता पाकिस्तानातील लोकं वीज चोरी करायला लागले आहेत.