Worlds First Vegetarian City In India : जगभरात मांसाहारापेक्षा शाकाहारी जेवण खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामागचे कारण म्हणजे शाकाहारी जेवण आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात करोना महामारीपासून अनेकांनी निरोगी आरोग्याच्या दृष्टीने मांसाहार करणेच सोडून दिले आहे. पण, दुसरीकडे मांसाहार जेवण आवडीने खाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. चिकन, मटण आणि मच्छी हे मांसाहारी लोकांचे आवडीचे पदार्थ. पण आपण भारताचा विचार केल्यास, भारत हा विविध सांस्कृतिक विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक कोसावर भाषा बदलते तशी खाद्यसंस्कृतीदेखील बदलते. येथे अशी अनेक शहरं आहेत जी त्यांच्या विविध शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पण, याच भारतात आता असं एक शहर आहे जे जगातील पहिले ‘शाकाहारी शहर’ म्हणून घोषित झाले आहे. पण, हे शहर नेमकं कोणत्या राज्यात आहे आणि त्यांनी मांसाहारवर बंदी का आणली याविषयी सविस्तर जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेले पालिताना हे शहर आता जगातील पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषित झाले आहे. या शहरात मांस खाण्यावर आणि खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हे मांसाहार बंदी असलेले शहरदेखील ठरले आहे. या निर्णयामुळे आता शहरात जनावरांची हत्या बेकायदा मानली जात आहे. इतकेच नाही तर शहरात अंडी विक्रीवरही बंदी आहे.

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना हे अगदी छोटेसे शहर जैन धर्मीयांसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. या शहरात अन्नासाठी प्राण्यांची हत्या करणे बेकायदा आहे, त्यामुळे शहरात मांस आणि अंडी विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे.

पालिताना हे शहर जैन धर्माचे पवित्र स्थान असल्याने मोठ्या संख्येने जैन धर्माचे अनुयायी इथे दर्शनासाठी येतात, याशिवाय ते काही दिवस येथे येऊन राहतात, त्यामुळे या ठिकाणी असलेल्या मांसाहारी पदार्थ्यांच्या विक्रीची दुकाने बंद करत प्राण्यांची हत्या थांबवा, अशी मागणी जैन अनुयायांनी सरकारकडे केली होती.

इतकेच नाही तर शहरातील २५० मांसाहार विक्रीची दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी सुमारे २०० हून अधिक जैन भिक्खूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. प्राण्यांची होणारी कत्तल रोखण्यासाठी सातत्याने त्यांनी उपोषण केले. सततच्या विरोधानंतर सरकारने या शहारातील मांसविक्रीवर पूर्णपणे बंदी घातली.

मांसाहारावर बंदी घालण्यामागे ‘हे’ आहे कारण

गुजरातच्या पालितानामध्ये मांसाहाराचा विरोध करणाऱ्या लोकांनी असा युक्तिवाद केला की, मांस आणि त्यासंबंधित इतर दृश्य ही फार त्रासदायक वाटतात, लोकांवर विशेषत: लहान मुलांच्या मनावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र पालिताना

पालिताना हे जैन समाजाचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या शहरात शेकडो मंदिरे आहेत. जगातील सर्वात मोठे मंदिर संकुल असल्याने या शहराला “जैन मंदिर शहर” असे टोपणनाव मिळाले आहे. शत्रुंजय डोंगराभोवती वसलेल्या या शहरात ८०० हून अधिक मंदिरे आहेत. या मंदिरांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास ३९५० पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिरांपैकी सर्वात प्रसिद्ध आदिनाथ मंदिर आहे. दरम्यान, ही सर्व मंदिरे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी दरवर्षी देशभरातील हजारो भाविक येत असतात. यात जैन धर्मीयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालिताना शहाराला आध्यात्मिक महत्त्व आहे.

पालितानानंतर आता राजकोट, वडोदरा, जुनागढ आणि अहमदाबादसह गुजरातमधील इतर शहरांमध्येही मांसाहार बंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. यात राजकोटमध्ये मांसाहारी पदार्थ तयार करणे, त्यांचे सार्वजनिकरित्या प्रदर्शन करण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palitana is the worlds first vegetarian city in india here non veg is considered illegal know in details sjr
Show comments